तमाम क्रिकेटप्रेमींसाठी ‘देव’ असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर येत्या नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून आपल्या कारकिर्दीची २००वी कसोटी खेळणार आहे. मात्र, ही कसोटी त्याच्या एकूण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवटचा सामना ठरण्याची चिन्हे आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सचिनची निवड करतानाच यापुढे विक्रमांच्या जोरावर नव्हे तर केवळ विद्यमान कामगिरीच्या जोरावरच त्याचे भवितव्य ठरेल, असे राष्ट्रीय निवडसमितीनेच त्याला बजावले आहे.
वेस्ट इंडिजचा संघ नोव्हेंबर महिन्यात भारतात येणार आहे. यावेळी सचिन २००वी कसोटी खेळून कसोटी कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा पार करणार आहे. या पाश्र्वभूमीवर निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी अलीकडेच सचिनची भेट घेऊन त्याच्या भविष्यातील कारकिर्दीविषयी चर्चा केली. या चर्चेत पाटील यांनी सचिनला त्याने संघातील स्थान गृहीत धरू नये असे स्पष्ट केल्याचे समजते. चाळिशीत असलेल्या सचिनच्या मैदानावरील हालचाली मंदावल्या आहेत. तसेच त्याच्याकडून अधिक धावाही होत नसल्याचे निरीक्षण यावेळी मांडण्यात आले. तसेच अनेक तरुण व होतकरू खेळाडू संघात स्थान मिळवण्यास उत्सुक असल्याचेही सचिनला विषद करण्यात आल्याचे निवड समितीच्या एका सदस्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले. संदीप पाटील यांनी सचिनच्या संघातील स्थानाबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याशीही चर्चा केल्याचे समजते.
आकडेवारी बोलते
सचिनला मागील १२ कसोटी सामन्यांत फक्त दोनदाच अर्धशतकी पल्ला गाठता आला आहे. तर २०११मधील शतकानंतर अद्याप एकही शतक सचिनच्या नावावर नाही. याच गोष्टी विचारात घेऊन निवड समितीने सचिनच्या भवितव्याचा निर्णय घेण्याचे ठरवल्याचे समजते.