|| संदीप आचार्य
केंद्राकडून १८० कोटींचा निधी, देशातील तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी उपक्रम
देशातील तंत्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या तंत्रशिक्षण दर्जा सुधारणा कार्यक्रमांतर्गत (टेक्युप-३) यंदा राज्यातील १२ अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्थांची निवड करण्यात आली आहे. वेगवेगळ्या राज्यांतील १७३ संस्थांची निवड या योजनेअंतर्गत करण्यात आली असून यात सर्वाधिक संस्था महाराष्ट्रातील आहेत.
केंद्र शासनाच्या माध्यमातून २००२ पासून तंत्रशिक्षण दर्जा सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत असून यात यापूर्वी प्रामुख्याने देशभरातील आयआयटींची निवड केली जायची. फारच थोडय़ा खासगी अथवा अनुदानित संस्थांची या उपक्रमांतर्गत निवड होत होती. तसेच यापूर्वी केंद्र व राज्य सहभागातून अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जायचा. तथापि यंदापासून टेक्युप-३ मध्ये निवड झालेल्या सर्व संस्थांना केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार असून एकूण तीन गटांत ही निवड करण्यात आली आहे.
यात पहिल्या गटात १३ राज्यांतील ९१ संस्था असून त्यांना प्रत्येकी १५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत, तर दुसऱ्या गटात १० राज्यांतील १० संस्था असून यांना २० कोटी रुपये आणि तिसऱ्या गटातील १२ राज्यांमधील ७२ संस्थांना प्रत्येकी सात कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
जगातील नामांकित संस्थांच्या दर्जा व मानकांनुसार देशांतर्गत अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा सुधारावा या दृष्टिकोनातून ‘टेक्युप’च्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येते. या अंतर्गत अत्याधुनिक उपकरणांची खरेदी करणे, शैक्षणिक दर्जा सुधारणा, प्रयोगशीलता, अनुभवसिद्ध अभियांत्रिकी शिक्षणाचे प्रयोग आदी अनेक उपक्रम या निधीतून राबविण्यात येणार असून या उपक्रमांचे योग्य प्रकारे नियंत्रण होते अथवा नाही याची पाहाणी करण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या निधीपैकी ४० टक्के निधी हा यंत्रसामग्री खरेदीसाठी तर ५० टक्के निधी हा शैक्षणिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी खर्च करावयाचा आहे.
राज्यस्तरावर या उपक्रमाची देखरेख करण्यासाठी प्रथमच राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाची निवड करण्यात आली असून यासाठी ‘राज्य प्रकल्प सुलभता गटा’ची (एसपीयूएफ) स्थापना करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांच्या अध्यक्षतेखाली उपसचिव सतीश तिडके, डॉ. सहसंचालक सुरेश यावलकर, डॉ. अनिल नांदगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
टेक्युप-३ मध्ये चार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांची निवड झाल्यामुळे या महाविद्यालयांचा अभियांत्रिकी दर्जा सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. राज्य तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अभ्यास गटाची यापूर्वीच स्थापना करण्यात आला असून जागतिक पातळीवरील स्पर्धेला पूरक ठरण्यासाठी आम्ही पद्धतशीर प्रयत्न करत आहोत. – डॉ. अभय वाघ, राज्य तंत्रशिक्षण संचालक
निवड झालेल्या संस्था
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे १२ अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रथमच चार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे. यात पुणे, औरंगाबाद, कराड व जळगाव ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये असून याशिवाय व्हीजेटीआय, आयसीटी, सरदार पटेल ही मुंबईतील महाविद्यालये आहेत. तसेच नांदेड येथील गुरू गोविंद सिंहजी, सांगलीचे वालचंद, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान विभाग, जळगावमधील रसायन तंत्रज्ञान संस्था आणि लोणेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे.