‘आत्मविश्वास आणि अनेक नकार पचवूनही अभिनय क्षेत्रातच नाव कमावण्याची जिद्दच मला इथपर्यंत घेऊन आली आहे’.. एका जाहिरातीतील चेहऱ्यापासून रुपेरी पडद्यावरून परिचित झालेली आणि चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावून यशाच्या शिखरावर पोहोचलेली उषा जाधव हिने शिखर गाठलेल्या यशाचे गमक उघड केले, आणि कोल्हापुरातील मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या व चित्रपटक्षेत्राची कोणतीही पाश्र्वभूमी नसलेल्या या गुणी अभिनेत्रीच्या संघर्षांचा प्रवासही रम्यपणे उलगडत गेला..
मायानगरीत ‘सवरेत्कृष्ट अभिनेत्री’ची राष्ट्रीय मोहोर उमटविणाऱ्या उषाच्या संघर्षांच्या आणि यशाच्या या कथेने लोकसत्ता व्हिवा लाऊंज कार्यक्रमासाठी आलेल्या असंख्य उपस्थितांच्या चेहऱ्यावर कौतुकाची रेषा उमटली. मग गप्पांना क्षणगणिक रंग चढत गेला!..
गेल्या वर्षी ‘कौन बनेगा करोडपती’च्या प्रमोशनासाठी केलेली एक जाहिरात झळकली. अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसलेली एक मुलगी मोठय़ा विश्वासाने ‘बधाई हो! बेटी हुई है..’ असे सांगताना दिसते. वर्ष संपता संपता याच सावळ्याशा मुलीने राष्ट्रीय पुरस्कार मिळविला. अभिनयाच्या प्रेमापोटी संघर्ष करून उत्तम अभिनेत्री म्हणून नावलौकीक कमावणाऱ्या उषाने सहजपणे आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी, ‘स्ट्रगल’ करताना आलेल्या अडचणींविषयी बुधवारी ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावर गप्पा मारल्या. व्हिवा लाऊंजच्या अतिथी संपादिका व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी तिला बोलते केले.  
‘धग’ या चित्रपटापर्यंत पोहोचण्यासाठी उषा जाधवला जवळजवळ सात वर्षे संघर्ष करावा लागला. म्हणजे चित्रपटसृष्टीत शिरायचे तर मुळातच कोल्हापूरच्या आपल्या घरातून बाहेर पडण्यापासूनच या संघर्षमय प्रवासाची सुरुवात झाली होती, असे तिने सांगितले. कलेसाठी प्रसिद्ध म्हणून तिने पहिल्यांदा पुणे गाठले. आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी नोकरी करायची, नोकरीच्या पाठी धावताधावता पुन्हा कला मागेच राहिली. मग थेट मुंबई गाठायची असा विचार केल्याचे उषाने सांगितले.
(सविस्तर वृत्तान्त २१ जूनच्या ‘व्हिवा’ पुरवणीमध्ये वाचा..)