बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून ई-व्हिसाची विक्री करून ४१ वर्षीय अनिवासी भारतीय महिलेची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले. गंभीर बाब म्हणजे याच व्हिसावर ही महिला प्रवास करून अमेरिकेतून भारतात आली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा >>>महाविकास आघाडी नेत्यांच्या ताफ्यात निर्भया निधीतील वाहने; चित्रा वाघ यांचा आरोप
४१ वर्षांची तक्रारदार अनिवासी भारतीय महिला व्यवसायाने डॉक्टर असून गेल्या १५ वर्षांपासून ती अमेरिकेत वास्तव्यास आहे. तिचे कुटुंबिय मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात राहतात. तिच्या बहिणीचा १४ डिसेंबर रोजी विवाह असल्याने ती कुटुंबियांसोबत भारतात येणार होती. तिच्या मुलीकडे व्हिसा नसल्याने तिने भारतीय ई-व्हिसासाठी गुगलवर शोध घेतला. यावेळी तिला एक संकेतस्थळ दिसले. या संकेतस्थळावर तिने तिच्या मुलीच्या व्हिसासाठी अर्ज केला. त्यासाठी तिने १३२ डॉलर (सुमारे ११ हजार रुपये) भरले. तिला ६ डिसेंबर रोजी रक्कम मिळाल्याचा एक संदेश प्राप्त झाला. त्यानंतर तिने संबंधित संकेतस्थळावर तिच्या मुलीच्या व्हिसा प्रक्रियेबाबत तपासणी केली. त्यावेळी संबंधित प्रक्रिया सुरू असल्याचे तिला दिसले. नंतर तिला ई-व्हिसा मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. ती ९ डिसेंबर रोजी अमेरिकेतून भारतात येण्यासाठी निघाली. शनिवारी रात्री २ वाजता ती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. यावेळी इमिग्रेशन अधिकार्यांनी तिच्यासह तिच्या तिन्ही मुलीच्या व्हिसाची कागदपत्रे तपासली असता तिच्याकडे असलेला ई-व्हिसा बोगस असल्याचे उघडकीस आले. तिने घडलेला प्रकार इमिग्रेशन अधिकार्यांना सांगितला. चौकशीअंती संबंधित संकेतस्थळ बोगस असल्याचे उघडकीस आले. संकेतस्थळ चालविणार्या अज्ञात व्यक्तीने ई-व्हिसासाठी रक्कम घेऊन तिची फसवणूक केली होती. त्यानंतर तिने सहार पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी फसवणूक करणे आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला.