मुंबईः नेदरलॅन्ड येथील विमान कंपनीच्या मालकाची साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील वाहतूक कंपनीच्या एका संचालकाला बुधवारी अटक केली. सुप्रीम ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अमित अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कंपनीच्या इतर संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भादंवि कलम ४२०, ४०९, ४६५, ४६७, ४६८, ४६१ आणि ३४ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेदरलॅन्ड येथील कंपनी ट्रॅक एअर बी व्हीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिशेल नीफेल यांचे प्रतिनिधी विशाल शुक्ला यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. तक्रारदार कंपनी विमानांची खरेदी विक्री करते. तसेच अपघात झालेल्या विमानाची दुरुस्ती करते. सुप्रीम ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन प्रायव्हेट लिमिटेडचे विमानाचा २०१८ मध्ये राजस्थानच्या गंगानगर विमानतळावर अपघात झाला होता. त्यावेळी तक्रारदार कंपनीने संचालक अमित अग्रवाल यांच्याशी संपर्क साधून विमान विक्रीबाबत विचारणा केली. अग्रवाल यांनी विमान विकण्याचे मान्य केले आणि त्याची भारतीय नोंदणीही रद्द केली. त्यानंतर, २० जुलै २०२२ मध्ये विमानाच्या विक्रीसाठी साडे पाच लाख अमेरिकन डॉलर (साडे चार कोटी रुपये) रकमेचा खरेदी करार ठरला. त्यानुसार दोन्ही कंपन्यांनी एकत्र उघडलेल्या बँक खात्यात साडेपाच लाख अमेरिकन डॉलर्स जमा करण्यात आले. पण, या विमानाबाबत राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर कायदेशीर वाद सुरू होता. त्यावेळी न्यायालयाने निर्णयापूर्वी विमान विक्री न करण्याचे आदेश दिले. मात्र, या संपूर्ण विवादाबाबत नेदरलॅन्डच्या कंपनीला अंधारात ठेवण्यात आले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

हेही वाचा : शिवाजी पार्कच्या मैदानासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चुरस

अमित अग्रवाल यांनी त्यांना विमानाचे जयपूर विमानतळाचे शुल्क भरायचे असल्याचे सांगितले आणि त्यासाठी एक पावती पाठवली. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये नीफेल यांनी सुप्रीम ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या खात्यात साठ हजार अमेरिकन डॉलर्स पाठवले. हे विमान कंटेनरमध्ये भरून गुजरात येथील बंदरावर रवाना झाले. त्यावेळी अग्रवाल यांनी उर्वरीत चार लाख ९० हजार अमेरिकन डॉलर्स त्यांच्या मामाच्या लंडन येथील कंपनीच्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले. त्यानंतर ४ मे २०२३ ला नीफेल यांना बँकेचा एक ईमेल आला. त्यात विमानाच्या मालक कंपनीने विमान खरेदी करण्यासाठी बँकेचे साडे बारा कोटींचे कर्ज घेतले होते. त्यातील १० कोटी ४९ लाख रुपये बाकी असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : तंबाखू आणि गुटख्यांच्या जाहिरातींविरोधातील याचिका निव्वळ प्रसिद्धीसाठी, उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर याचिका मागे

कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबईतील डीआरटी (डेब्ट्स रिकव्हरी ट्रिब्युनल) न्यायालयातही धाव घेतली असून बँक हे विमान ताब्यात घेण्याची प्रक्रिया करत असल्याचे सांगितले. दरम्यान, सुप्रीम ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या इतर संचालकांनी मुंबईतील एनसीएलटी न्यायालयात जाऊन अमित अग्रवाल यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून कंपनीचे विमान विकल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने सीमाशुल्क विभागाला विमान देशाबाहेर जाण्यापासून रोखण्याचे निर्देश दिले. याबाबत अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रक्कम देण्यास नकार दिला व न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत वाट पहावी लागेल, असे सांगितले. त्यानतंर नीफेल यांच्यावतीने याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selling of aircraft mumbai eow arrests businessman who duped netherlands national of rs 4 5 cr mumbai print news css