मुंबई : समाज माध्यमे, शोध इंजिन आणि ऑनलाइन तंत्रज्ञान मक्तेदारी या सर्वाचा परिणाम म्हणून प्रत्येकाच्या खासगी आयुष्यात घुसखोरी झाली आहे. आपल्यापैकी बरेच जण आनंदाने आपली माहिती या कंपन्यांना त्यांच्या सेवा वापरण्यासाठी सुपूर्द करतात, कारण ते महत्त्वाच्या सुविधा देतात. असे असताना गोपनीयतेच्या हक्काचा भंग होतो. याबद्दल खंत व्यक्त करण्याचा अधिकार आपल्याला आहे का? असे मत अमेरिकन कादंबरीकार आणि पत्रकार डेव्ह एगर्स यांनी ‘टाटा लिटरेचर फेस्टिव्हल’मध्ये व्यक्त केले.
ऑनलाईन कार्यक्रमांच्या शेवटच्या सत्रात ‘डिजिटल एशिया हब’च्या उद्घाटक मालविका जयराम आणि आईज ऑन यु यांचे गोपनीयता आणि तंत्रज्ञान या विषयावर चर्चासत्र झाले. आम्ही भूमिका घेऊन या सेवांवर बहिष्कार टाकायचा का? या तंत्रज्ञानाच्या दिग्गजांनी आपल्या स्वायत्ततेचे काय केले आहे, हे पाहण्याची ताकद आता केवळ काल्पनिक कथांमध्ये आहे का? असे मुद्दे डेव्ह एगर्स यांनी उपस्थित केले.
‘ट्रुथ ऑर डेअर – द फ्युचर ऑफ इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझम’ या विषयावर माध्यम विश्लेषक गीता शेषू यांनी पिल्गर यांच्याशी संवाद साधला.
लेखक पंकज मिश्रा यांच्या ‘रन अँड हाईड’ या पुस्तकाविषयी चर्चा झाली. सुंदर अशा भूमीला सध्या अनेक विकास प्रकल्प, धरणांचे प्रकल्प संपवत आहेत. मनाला प्रफुल्लित करणाऱ्या घाटांची, पर्वतांची आपण विटंबना करत आहेत. ही निसर्गाप्रती कृतघ्नता आहे आणि ह्या पुस्तकात हाच मानवी दोष दर्शवला आहे, असे मिश्रा यांनी सांगितले.
टाटा लिटरेचर लाईव्ह मुंबई लिट-फेस्टिव्हल या प्रतिष्ठित साहित्य महोत्सवाची ऑनलाईन सत्रे बुधवार आणि गरुवारी रंगल्यानंतर या महोत्सवात शुक्रवारपासून रविवापर्यंत प्रत्यक्ष सत्रे होणार आहेत.
‘पत्रकाराने सत्य सांगण्याचा प्रयत्न करावा’
पत्रकाराने त्याच्याकडे असलेल्या खऱ्या माहितीद्वारे लोकांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करावा. जे सत्य आहे तेच लोकांपर्यंत पोहचवणे म्हणजे ‘पत्रकारिता’. शोध पत्रकारितेमध्ये आव्हानांना सामोरे जाण्याची आणि जनतेला सत्य सांगणे याची तयारी पत्रकाराने ठेवायला हवी, असे मत आंतरराष्ट्रीय शोध पत्रकार जॉन पिल्गर यांनी या सत्रात व्यक्त केले.