कळवा, मुंब्रा, कौसा परिसरावर कोटय़वधी रुपयांच्या विकासकामांचा वर्षांव होत असल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी मुंब्र्यायातील साफसफाईच्या खासगीकरणाचा महत्त्वाचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत बहुमताच्या जोरावर फेटाळून लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना एक प्रकारे धक्का दिला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार येत्या १९ मे रोजी या परिसरात वेगवेगळ्या विकासकामांच्या शुभारंभासाठी येत असून या वेळी ते काही नामकरण सोहळ्यांनाही उपस्थिती लावणार आहेत. असे असताना कळव्यातील एका रस्त्याला ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कावेरीताई पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्तावही शिवसेना-भाजपने बहुमताच्या जोरावर फेटाळून लावल्याने पवारांच्या मुंब्र्यातील बहुचर्चित दौऱ्यापूर्वी महापालिकेतील राजकीय वर्तुळात नवे वादंग उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ठाणे, कळवा, दिवा भागांत महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने सफाईची कामे होत असताना एकटय़ा मुंब्र्यात सफाईचे खासगीकरण कशासाठी, असा सवाल उपस्थित करीत नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे सदस्य आक्रमक बनले. साफसफाईचे खासगीकरण करताना मुंब्र्यात प्रत्येक वर्षी आठ कोटी रुपयांचा दौलतजादा केला जात असेल, तर ठाणेकरांनी कुणाचे घोडे मारले आहे, असा सवाल करीत शिवसेना सदस्यांनी ठाणे-मुंब्रा हा जुना वाद शिवसेनेने पुन्हा एकदा उकरून काढण्याचा प्रयत्न केला. महापालिका आयुक्त आर.ए.राजीव यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात कळवा-मुंब्रा परिसराच्या विकासकामांसाठी कोटय़वधी रुपयांची तरतूद केली असून यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. मुंब्रा तसेच कळवा रेल्वे स्थानक परिसराच्या विकासाचे कामही झपाटय़ाने सुरू असून राजीव यांनी या कामांमध्ये जातीने लक्ष घातले आहे. ठाण्याच्या तुलनेत कळवा, मुंब्रा परिसरातील रहिवासी मालमत्ता कर कमी भरतात, पाण्याची सर्वाधिक चोरी याच भागात होते. असे असताना ठाण्यातील विकासकामांचा पैसा मुंब्र्यायाकडे वळविला जात असल्याचा प्रचार शिवसेनेचे काही सदस्य दबक्या आवाजात करीत असून ठाणे-मुंब्रा वादाचे पडसाद आता उघडपणे उमटण्यास सुरुवात झाली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मुंब्र्यायातील साफसफाईच्या खासगीकरणाचा प्रस्ताव शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांना हाताशी घेत फेटाळून लावल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. या वेळी कळवा, मुंब्रा भागातील काही नामकरणाचे प्रस्तावही मांडण्यात आले होते. यामध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कावेरीताई पाटील यांचे नाव एका मार्गाला देण्याच्या प्रस्तावाचा समावेश होता. १९ मे रोजी मुंब्र्यायात येणारे शरद पवार कावेरीताईंच्या घरी जाणार आहेत. असे असताना संबंधित रस्त्याला यापूर्वीच एस.एम.जोशी यांचे नाव देण्यात आले आहे, असे सांगत शिवसेना सदस्यांनी नव्या नामकरणाचा प्रस्तावही फेटाळून लावल्याने पवारांच्या दौऱ्यापूर्वी ठाण्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.