खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महायुतीत घेण्यासाठी मंगळवारी मातोश्रीवर झालेल्या नेत्यांच्या बैठकीपासून रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना दूरच ठेवण्यात आले. त्याबद्दल त्यांनी नाराजीचा सूर लावताच बैठक झाल्यानंतर त्यांना घाईघाईने मातोश्रीवर बोलावून घेण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत शेट्टी यांच्या महायुतीतील सहभागाची घोषणा करण्यात आली. मात्र या साऱ्या प्रकाराबद्दल आठवले यांनी या पुढे आरपीआयला वगळून महायुतीची बैठक होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा शब्दात सेना-भाजपच्या नेत्यांकडे आपली नापसंती नोंदविली.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टी यांनी चांगला जम बसविला आहे. आगमी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शेट्टी यांनी सोबत यावे यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु होते. त्यानुसार मंगळवारी मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि आरपीआय वगळून समन्वय समितीतील सेना-भाजपचे सदस्य उपस्थित होते. मातेश्रीवर बैठक सुरु असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या सिवधान या आपल्या निवासस्थानी रामदास आठवले आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करीत होते. बैठकीला बोलावले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आठवले यांच्या नाराजीची बातमी मातोश्रीपर्यंत पोहोचल्यानंतर स्वत उद्धव ठाकरे यांनी त्यांना दूरध्वनी करुन बोलावून घेतले. अर्थात तोपर्यंत बैठक संपलेली होती. अगदी औपचारिकता म्हणून आठवले यांना बैठकीतील माहिती देण्यात आली आणि त्यांच्या उपस्थितीत ठाकरे व मुंडे यांनी राजू शेट्टी यांच्या महायुतीतील समावेशाची घोषणा केली. या साऱ्या प्रकाराबद्दल आठवले कमालीचे नाराज झाले. निदान यापुढे तरी जेव्हा महायुतीची म्हणून बैठक होईल, किंवा महायुतीच्या वतीने काही निर्णय घ्यायचे असतील, त्यावेळी आरपीआयला सोबत घ्या, असे त्यांनी ठाकरे व मुंडे यांना सांगितले. त्यानंतर राजू शेट्टी यांनी आठवले यांची स्वंतत्र भेट घेऊन राजकीय चर्चा केली. शेट्टी यांच्या महायुतीतील सहभागाचे त्यांनी स्वागत केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा