ज्येष्ठ समाजवादी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर सोमवारी कोल्हापूरात झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेने पुन्हा एकदा सत्तेची सूत्रे हाती असलेल्या भाजपला लक्ष्य केले आहे. दाभोलकरांची हत्या झाली तेव्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते व दाभोलकरांच्या खुनावरून त्या सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले होते. आता दिवसाढवळ्या झालेल्या पानसरे यांच्यावरील निर्घृण हल्ल्याची जबाबदारी कोणी घ्यायची?, असा सवाल शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून उपस्थित करण्यात आला. यापूर्वीही राज्यातील अनेक प्रश्नांवरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील विसंवाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर भाजपला खडे बोल सुनाविण्यासाठी शिवसेनेकडून अनेकदा सामनातील अग्रलेखाचा आधार घेतला जाताना दिसत आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे साफ धिंडवडे निघाले आहेत व गुन्हेगार मोकाट सुटले आहेत असे बोंबलावे तर सरकार आपलेच आहे, पण आज दुसरे एखादे सरकार असते तर त्यांना याच शब्दांनी बेदम चोपले असते, असे सांगत शिवसेनेने भाजपला टीकेचे लक्ष्य केले आहे.
गोविंद पानसरेंवर भ्याड हल्ला करणार्‍यांना मात्र भलताच चेव चढला आहे. हे चित्र नव्या सरकारने तत्काळ बदलायलाच हवे, असा सल्ला शिवसेनेने या अग्रलेखातून भाजपला दिला.

Story img Loader