मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आणि समर्थकांच्या मिरवणुकीने जाऊन अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लटके यांच्याबरोबर शिवसेनेबरोबरच महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तर पटेल यांच्याबरोबर भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते उपस्थित होते. दोन्ही उमेदवारांच्या समर्थक नेत्यांनी दणदणीत विजय मिळण्याचा दावा केला आहे. महापालिकेत लिपीक म्हणून काम करीत असलेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा आयुक्तांवर दबाव असल्याने मंजूर झाला नव्हता आणि अखेर उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करुन आदेश दिल्याने पालिकेने गुरुवारी सायंकाळी त्यांचा राजीनामा मंजूर केला. हे पत्र त्यांना मिळाल्यावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी लटके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

विरोधकांनी तांत्रिक अडचणी निर्माण केल्याने छाननीच्या वेळीही काही मुद्दे उपस्थित होण्याची शक्यता गृहीत धरून शिवसेनेने सावध पवित्रा घेऊन संदीप नाईक यांचाही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लटके यांचा अर्ज वैध ठरल्यावर नाईक यांचा अर्ज मागे घेतला जाईल, असे ज्येष्ठ शिवसेना नेते अ‍ॅड. अनिल परब यांनी सांगितले. मुरजी पटेल यांनी काही दिवसांपासून निवडणुकीची तयारी सुरू केली असली तरी ही जागा भाजप लढणार की शिंदे गट यावरुन रस्सीखेच सुरू होती. पण गुरुवारी रात्री भाजपनेच ही जागा लढवावी, असा निर्णय झाल्यावर पटेल यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

पटेल यांनीही सावधपणे दोन अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना फुटीनंतर होत असलेल्या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे आणि शिंदे गट- भाजप आमनेसामने असल्याने अटीतटीची लढाई होणार आहे. दोन्ही पक्षांचे उमेदवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार असल्याने अंधेरी निवडणूक कार्यालयाबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आहे. कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊ नये, यासाठी निवडणूक कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात पोलिसांनी लोखंडी अडथळे उभारले होते. दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आणि शेकडो समर्थक व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले. मुरजी पटेल यांचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, आमदार प्रवीण दरेकर, अमित साटम व शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर आदी नेते उपस्थित होते. तर शिवसेना उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासमवेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदी नेते उपस्थित होते.

आरोप- प्रत्यारोप

* मूळ शिवसेना आमचीच असून मुरजी पटेल हे बहुमताने विजयी होतील, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही आवाहन केले होते. पण आम्ही निवडणुकीसाठी तयार असून लटके या मोठय़ा मताधिक्याने जिंकून येतील, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.

* मुंबई व महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने ही पोटनिवडणूक महत्त्वाची असून मुरजी पटेल यांच्या विजयाची आम्हाला पूर्ण खात्री असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. राजीनामा स्वीकारणे किंवा न स्वीकारणे हा महापालिकेचा अधिकार आहे आणि न्यायालयाने याप्रकरणी आदेश दिले आहेत. भाजपचा यात काहीही संबंध नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

* ‘माणुसकी विरुद्ध खोकासुर ’ अशी ही लढाई असल्याची टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. लटके यांनी निवडणूक लढवू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. सरकारचा पालिकेवर दबाव होता. पण न्यायालयाने दणका दिला. साम, दाम, दंड, भेद या सर्व बाबींचा वापर होत आहे. आम्ही गद्दारांबरोबर नाही, हे दाखविण्यासाठी ही निवडणूक असल्याचे त्यांनी सांगितले.

* ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन आपल्या पक्षाचे नाव ‘रडकी सेना’ असे बदलून घ्यावे, अशी टिप्पणी केली आहे. सत्तेत असताना केंद्र सरकारच्या नावाने रडले आणि विरोधी पक्षात गेल्यावर न्यायालय आणि आयोगाच्या नावाने रडत आहेत, अशी टीका शेलार यांनी केली.

*  देशात सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार लटके या निश्चितपणे विजयी होतील, असे नमूद केले, तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुरजी पटेल कोण, मी ओळखत नाही, असा सवाल करीत आम्ही ही निवडणूक जिंकू, असे सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sena s rutuja latke bjp murji patel filed nomination for andheri east assembly by poll zws