सिद्धीसाई इमारतीतल्या रहिवाशांच्या आरोपांनुसार सोसायटीतील अध्यक्ष, सचिवासह प्रमुख चार पदे शितप कुटुंबाने आपल्याकडे घेतली होती. त्यामुळे त्यांच्या मनमानीला थारा उरला नव्हता. दरम्यान, दुर्घटनेच्या आठ दिवसांआधी तळमजल्यावर सुरू असलेल्या अवैध कामाबाबत महापालिकेकडे तक्रार केली होती. १७ जुलैला पालिकेचे अधिकारी इमारतीत आले, त्यांनी पाहाणी केली. मात्र पुढे काय घडले काहीच पत्ता नाही, असा दावाही कुमार करतात.
इमारतीतील रहिवासी विरेंद्र कुमार यांच्यानुसार शितपने तळमजल्यावरील तीन खोल्या एकत्र करून त्या व्यावसायिक उद्देशाने भाडय़ाने दिल्या होत्या. या जागेत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पद्मा खाडे यांचे रुग्णालय सुरू झाले. शितप या रुग्णालयाचा मालमत्ता कर स्वतंत्रपणे भरत होता. रुग्णालयासाठी स्वतंत्रपणे जलवाहिनीही जोडून घेतली होती. वर्षभरापूर्वी रहिवासी जागेत रुग्णालय कसे काय सुरू झाले, याबाबत मी स्वत: पालिकेकडे तक्रार केली होती. मात्र आता अशी कोणतीही तक्रार आम्हाला मिळालेली नाही, असा दावा पालिका अधिकारी करत आहेत. शितपने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यासाठी सर्व रहिवाशांवर दबाव आणला होता, असेही कुमार यांनी सांगितले.
मौल्यवान वस्तू सापडल्या
ढिगारा उपसताना हाती लागलेल्या मौल्यवान वस्तू पार्कसाईट पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतल्या आहेत. यात रोख रक्कम, दागिने आणि अन्य वस्तूंचा समावेश आहे. या सर्व वस्तूंची नगाप्रमाणे यादी तयार करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू आहे. खातरजमा करून या सर्व वस्तू रहिवाशांना परत केल्या जाणार आहेत.
दरम्यान, सिद्धीसाई इमारतीचा ढिगारा घाटकोपरमधील महापालिकेच्या माणिकलाल क्रीडांगणात आणून ठेवला जात आहे. या ढिगाऱ्याची तपासणी करून हाती येणारी प्रत्येक वस्तू पोलीस हस्तगत करतील. त्या वस्तूची यादीत नोंद होईल. त्यानंतर खातरजमा करून रहिवाशांना परत केली जाईल.
ढिगाऱ्यातून लोखंडी ‘बीम’ सापडले
सिद्धीसाई इमारतीच्या ढिगाऱ्यातून अग्निशमन दलाने तब्बल १४ लोखंडी बीम बाहेर काढले. पुढील तपासासाठी पार्कसाईट पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहेत. शितपने तळमजल्यावरील इमारतीचे खांब (पिलर) नष्ट केल्यानंतर या लोखंडी बीमचा टेकू इमारतीला लावला होता, असा संशय पोलिसांना आहे. हस्तगत लोखंडी बीमची तज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे, असे सांगण्यात आले.