आरोपी सुनील शितपची न्यायालयात उलटी बोंब
मी या अपघाताला जबाबदार नाही. इमारत धोकायदायक अवस्थेत होती. मी डागडुजीसाठी मान्यताप्राप्त वास्तुविशारदाकडून सल्ला घेऊन डागडुजीचे काम सुरू केले होते. उलट इमारतीतील अन्य रहिवाशांचा डागडुजीला विरोध होता, अशी उलटी बोंब आरोपी सुनील शितप याने बुधवारी दंडाधिकारी न्यायालयात मारली. वकिलामार्फत त्याने दुर्घटनेचे खापर अप्रत्यक्षरीत्या सिद्धीसाई इमारतीतील रहिवाशांवर फोडण्याचा प्रयत्न केला.
मंगळवारी मध्यरात्री शितपला पार्कसाईट पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्य़ात अटक केली. बुधवारी त्याला विक्रोळी न्यायालयात न्या. एच. बी. सीरसाळकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी शितपच्या वकिलाने सदोष मनुष्यवधाच्या कलमावर आक्षेप घेतला. हा अपघात होता. शितपचा हा अपघात घडावा असा हेतू नव्हता. त्याच्या या इमारतीत चार खोल्या आहेत. त्याचे कामगार त्याच इमारतीत काम करत होते. त्यामुळे अपघात घडविण्याचा हेतू कसा असेल, असा युक्तिवाद केला. त्याला सरकारी वकील अॅड. वैशाली आगावणे यांनी विरोध केला. परिणाम ठाऊक असूनही शितपने इमारतीत फेरबदल केल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
आरोपीला २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई : घाटकोपर येथील सिद्धिसाई इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ वर गेली असून सात जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता शोधमोहीम थांबवण्यात आली आणि सर्व ढिगारा व वस्तू शेजारच्या मैदानात हलवण्यात आल्या. या दुर्घटनेप्रकरणी सुनील शितप याला न्यायालयाने २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
तळमजल्यावरील जागेचे नूतनीकरण करण्यासाठी इमारतीचे खांब काढले गेल्याने कोसळलेल्या सिद्धिसाई इमारतीतील मृतांची संख्या बुधवारी पाचने वाढली. सकाळी साडेपाच वाजेपर्यंत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २८ व्यक्तींना काढण्यात आले. मात्र तळमजल्यावर एक कामगार अडकल्याच्या भीतीने ढिगारा उपसण्याचे काम अत्यंत काळजीपूर्वक सुरू होते. अग्निशमन दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाने संध्याकाळी ५.२५ वाजता सर्व ढिगारा बाजूला केला. २८ व्यक्तींपैकी १७ मृत असून त्यात नऊ स्त्रिया व तीन मुलांचा समावेश आहे. राजावाडी रुग्णालयात चौघांवर तर शांतिनिकेतन रुग्णालयात तिघांवर उपचार सुरू आहेत. इतरांना उपचार करून सोडण्यात आले.
तळमजल्यावरील रुग्णालयाला महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने २०१६ ते २०१८ पर्यंत परवानगी दिली होती. मात्र व्यवसाय बंद करण्यासंबंधी रुग्णालयाकडून दोन महिन्यांपूर्वी अर्ज आल्याने परवाना रद्द करण्यात आला. या ठिकाणी दुसऱ्या व्यवसायासाठी नूतनीकरणाचे काम सुरू होते. याबाबत वारंवार तक्रारी केल्याचा आरोप स्थानिकांनी केला असला तरी याबाबत कोणतीही लेखी तक्रार आली नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुख्य आरोपी सुनील शितप याला ताब्यात घेतल्यावर या घटनेला इतर कोणी जबाबदार आहे का, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. तळमजल्यावर इमारतीच्या मुख्य रचनेत बदल करण्यात आले का, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले गेले का, तसेच याबाबत पालिकेकडे तक्रार दाखल केली होती का याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
या घटनेचे पालिकेच्या सभागृहात व विधानसभा अधिवेशनात जोरदार प्रतिसाद उमटले. आरोपीसोबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावरही कारवाई करण्याची मागणी पालिका सभागृहात नगरसेवकांनी केली.