अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांचे वडील ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९६ वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंबर कोठारे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे आणि सून अभिनेत्री उर्मिला कोठारे असा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध अभिनेते – निर्माते – दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या बालकलाकार, तसेच निर्माता-दिग्दर्शक म्हणून झालेल्या जडणघडणीत अंबर कोठारे यांचे मोलाचे योगदान होते. महेश कोठारे यांचे निर्मिती – दिग्दर्शन क्षेत्रामधील पदार्पण असलेला ‘धुमधडाका’ हा चित्रपट यशस्वी होण्यासाठी अंबर कोठारे यांनी अपार कष्ट घेतले होते. त्यानंतर महेश कोठारे यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. ‘दे दणादण’ या चित्रपटामध्ये अंबर कोठारे यांनी खलनायकाची व्यक्तिरेखा साकारली होती. महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या काही महत्त्वाच्या कलाकृतींमध्येही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या.

हेही वाचा – ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंचा कानमंत्र; म्हणाले, “लोकांपर्यंत जाऊन…”

अंबर कोठारे यांचा जन्म १४ एप्रिल १९२६ रोजी मुंबईत झाला. त्यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कोठारे यांना वेगवेगळी कामे करावी लागली. दिवाळीत गिरगावात रस्त्यावर उटणे विकण्याचे कामही त्यांनी केले होते. कालांतराने शिक्षण पूर्ण करून ‘ब्रिटिश बँक ऑफ दि मिडल इस्ट’मध्ये त्यांनी नोकरी केली. तब्बल चार दशके त्यांनी बँकेत वेगवेगळ्या पदांवर काम केले. या बँकेचे भारतातर्फे प्रतिनिधित्व करण्याचीही संधी त्यांना मिळाली होती. नोकरी सांभाळून त्यांनी आपली रंगभूमीची आवडदेखील जोपासली होती. प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी दीर्घ काळ काम केले होते. ‘इंडियन नॅशनल थिएटर’ (आयएनटी) या संस्थेच्या मराठी विभागाचे ते पहिले सचिव होते. या संस्थेतर्फे त्यांनी बरीच नाटके रंगभूमीवर सादर केली.

हेही वाचा – केंद्राच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’साठी मुंबई महानगरपालिकेची स्वच्छता स्पर्धा

‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाचे त्यांनी शेकडो प्रयोग केले होते. अनेक नाटकांमध्ये त्यांनी अभिनयही केला होता. ‘झुंजारराव’ नाटकामधील त्यांची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली होती. अंबर कोठारे यांनी उत्तम नाटकांची निर्मितीही केली होती. त्यापैकी एक प्रमुख नाटक म्हणजे ‘जेथे जातो तेथे’. या नाटकामध्ये दत्ता भट यांच्यासोबतच अंबर कोठारे यांनी अभिनय केला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior actor amber kothare passed away mumbai print news ssb
Show comments