लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: ‘मला पुन्हा एकदा चित्रपटातून विनोदी भूमिका साकारायच्या आहेत, मात्र माझ्या वयाच्या अनुषंगाने उत्तम विनोदी कथा लिहिणारे लेखकच नाहीत’, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची पहिली झलक आज समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात आली. यावेळी अशोक सराफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विनोदी अभिनयाची हुकूमी जाण असलेले कलावंत म्हणून अशोक सराफ यांचा लौकिक आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ चित्रपट आणि रंगभूमीवर कार्यरत असलेल्या अशोक सराफ यांनी विविधांगी भूमिका केल्या आहेत. मात्र त्यांच्या विनोदी भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. हीच गोष्ट लेखकांच्या बाबतीतही अनुभवाला येते असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा… वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम संथगतीनेच, आतापर्यंत केवळ नऊ टक्केच काम पूर्ण
‘नवोदित लेखकांसाठी आजही मी विनोदी भूमिका साकारणारा नट आहे, परंतु त्यापलिकडेही मी विविध भूमिका साकारू शकतो अशी खात्रीच काही लेखकांना वाटत नाही असे जाणवते. माझ्या वयानुरुप आणि विनोदी अंगाने विचार करून लिहिणारे लेखक नाहीत याचीच खंत वाटते’, अशा शब्दांत त्यांनी सध्या चित्रपटांपासून लांब राहण्यामागचे कारण स्पष्ट केले.
हेही वाचा… कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत; शिंदे-फडणवीस सरकारचे मोठे निर्णय
मराठीत विनोदीपट जास्त दिग्दर्शित केले जात नाहीत. तशा प्रकारचे सकस विनोदी लेखनच होत नाही. विनोदाच्या नावाखाली ज्या संहिता लिहिल्या जातात त्याला विनोद म्हणणे म्हणजे स्वत:चीच फसवणूक करण्यासारखे आहे, अशा कडक शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. चांगल्या पटकथाच मिळत नसल्याने सध्या तरी चित्रपटांपासून दूर आणि रंगभूमीच्या अधिक जवळ असल्याचे सांगत सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘व्हॅक्युम क्लीनर’ या नाटकाने पावणेचारशे प्रयोगांचा टप्पा गाठल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
हेही वाचा… ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, जाहिरातीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ३० जूनला राज्यभरात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची पहिली झलक सावरकर स्मारक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आली. यावेळी दिग्दर्शक केदार शिंदे आणि चित्रपटातील कलाकार रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुकन्या कुलकर्णी, दीपा परब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.