आठवडय़ाची मुलाखत : वासुदेव कामत ( ज्येष्ठ चित्रकार)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महाराष्ट्राच्या कलाविश्वात गेल्या काही वर्षांपासून चित्रकार आणि रसिकांचा हरवून गेलेला संवाद बोरिवलीतील वनविहार उद्यानात १२ जानेवारीला झालेल्या चित्रप्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा साधला गेला. बंदिस्त कक्षात चित्रे काढून ती प्रदर्शनात मांडणे, या प्रक्रियेमध्ये रसिकांना हल्ली गृहीत धरलेले दिसत नाही. याला छेद देण्यासाठी सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी एका नव्या चळचळीचा प्रारंभ केला आहे. यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत..
* स्टुडिओऐवजी एका उद्यानात चित्रकलेचा कार्यक्रम करण्यामागचा नेमका उद्देश काय होता?
विद्यार्थिदशा सोडली तर नंतरचे बरेचसे चित्रकार आपली चित्रकला, आपला स्टुडिओ अशा बंदिस्त वातावरणात काम करतात. चित्रकाराला अंतर्मुख होऊन काम करावे लागते म्हणून त्याला एकांत हवा असतो. परंतु यामुळे चित्रकलेचा आणि रसिकांचा संपर्क हा थेट प्रदर्शनातच होताना दिसतो. पण चित्रकार काम कसा करतो, कॅनव्हासवर त्याच्या मनातली प्रतिमा कशी उतरवतो हे पाहणे रसिकांना आवडतं. असे कलेचे आविष्कार मांडताना कलाकार आणि रसिक यांच्यात जो संवाद होतो तो महत्त्वाचा आहे. लोकांमध्ये जाऊन, विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये जाऊन चित्रकाराने आपली कला सादर केली तर त्याला मिळणारा प्रतिसाद हा चांगला असतो. चित्रकाराबरोबरच रसिकांनाही कलानिर्मितीचा आनंद आणि कलेचा आस्वाद मिळावा हे मी चित्रकाराचे कर्तव्य समजतो. आपल्याकडे चित्रकलेबाबत समीक्षकांकडूनच लिहिल्यानंतर चित्रकार कसे आहेत, कसे काम करतात याची माहिती मिळते. त्यामुळे आपल्या कलेवर भर देतानाच रसिकांना त्यात सामावून घेणे तितकेच योग्य असल्याने हा कार्यक्रम केला.
* जॉन सिंगर सरजटच्या जयंतीचा योग साधण्यामागचे नेमके कारण काय होते?
अक्षय पै आणि अभिषेक आचार्य या दोघा नवोदित चित्रकारांना प्रथम वाटले की जॉन सिंगर सरजट या अमेरिकन चित्रकाराची जयंती साजरी करावी. १९व्या शतकाचा पूर्वार्ध आणि १८व्या शतकाच्या उत्तरार्धात हा चित्रकार होऊन गेला. या चित्रकाराने त्या काळी काढलेल्या चित्रांमुळे अनेकांना आजही प्रोत्साहन मिळते. चांगले चित्र काढायचे असेल तर सरजटची चित्रे पाहावीत विशेषत: त्याची मैत्रीण वऱ्हनॉन ली हिचे त्याने काढलेले चित्र हे प्रत्येकाने पाहावे असे आमचे शिक्षक आम्हाला सांगत असत. त्याची चित्रे आज कोणत्याही चित्रकलेच्या विद्यार्थ्यांस अथवा चित्रकारास दाखविली तर ते लगेच ओळखतील की ही चित्रे सरजट याने काढली आहेत. इतकी त्याच्या कलेतले वेगळेपण दिसून येते. जलरंग आणि तैलरंग यावर प्रभुत्व असलेला हा चित्रकार होता. आज आपल्या इथे अनेक महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. मग आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्यांची जयंती का साजरी केली जाऊ नये, असा विचार आमच्या मनात आला. म्हणून सरजटच्या १६१व्या जयंती निमित्ताने आम्ही बोरिवलीच्या वनविहार उद्यानात हा कला रसिकांना सामावून घेणारा कार्यक्रम सादर केला.
* चित्रकारच आपली कला लोकापर्यंत पोहोचविण्यात कमी पडतात असे वाटत नाही का?
चित्रकाराने आपल्या कलेचे जागरण केले पाहिजे. कलाकाराची कला लोकांपर्यंत पोहचावी, ती समाजाभिमुख व्हावी असे उद्दिष्ट बाळगले पाहिजे. आम्ही हा कार्यक्रम लोकांमध्ये न करता एका वातानुकूलित दालनात केला असता तरी चालले असते. पण लोकांनी आमची कला येऊन बघावी हा यामागचा उद्देश होता. रसिक जर कला पाहायला येत नसतील तर कलाकाराने रसिकांत जायची तयारी ठेवली पाहिजे. खरे तर माझे असे सातत्याने म्हणणे असते की, चित्रकाराने रिकाम्या हाताने घरातून बाहेर पडू नये. त्याने आपली चित्रे व चित्रकलेचे साहित्य घेऊनच घराबाहेर पडावे. दुर्दैवाने आजचा कलाकार हे करताना दिसत नाही.
* माध्यमे व सरकार हल्ली चित्रकलेला कितपत प्रोत्साहन देतात?
हल्लीची माध्यमे कलाकारांना कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन देताना दिसत नाहीत. माध्यमेच नव्हे तर सरकारी पातळीवरदेखील हेच उदासीनतेचे चित्र पाहायला मिळते. देशात केवळ महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे चित्रकारांच्या बाबतीत ही परिस्थिती दिसून येते. कोचीन, केरळ, अंदमान, ओरिसा, गुजरातसारख्या ठिकाणी कलाकारांना तिथल्या सरकारांकडून प्रोत्साहन मिळते. गुजरातमध्ये तर चित्रकारांना तिकिटांमध्ये सवलती मिळतात. नवकलेच्या दिवसांत ‘पोट्र्रेट’ ही कला नाही असे म्हणण्यापर्यंत काही कला समीक्षकांची मजल गेली आहे. तपश्चर्येतून जोपासलेल्या निसर्ग चित्रणाबाबत जर अशी भूमिका घेतली जाते तर ते कितपत योग्य आहे? राज्यात असे वातावरण असल्यास कलाकारांना वाव कसा मिळेल, असा प्रश्न पडतो.
* चित्रकला सादरीकरणाच्या या नवप्रयोगाबाबत पुढे काय करणार आहात?
गेल्या तीन वर्षांपासून राज्यात आम्ही हा प्रयोग करतो आहोत. पण इथून पुढे मुंबईसह राज्याच्या अन्य भागांत व राज्याबाहेर असे कार्यक्रम करणार आहोत. ज्याप्रमाणे ‘पोट्र्रेट सोसायटी ऑफ अमेरिका’ ही अमेरिकेतील संस्था काम करते त्या धर्तीवर आम्ही इथे काम करणार आहोत. म्हणून महाराष्ट्रातही आम्ही ‘पोट्र्रेट आर्टिस्ट’ हा कलाकारांचा समूह तयार केला आहे. यात अनेक छोटे-मोठे चित्रकार, कलेचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. फेसबुकवर आम्ही याची एक स्पर्धा घोषित करतो आणि त्यातील विजेत्यांना भरघोस पारितोषिके देतो. यामुळे चित्रकाराला मंच मिळतो, रसिकांशीही तो जोडला जातो. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये आम्ही असा कार्यक्रम जेव्हा केला तेव्हा प्रवेशद्वाराच्या बाहेपर्यंत मोठ-मोठय़ा रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बाकीचे काही म्हणत असले तरी निसर्ग चित्रणाची आवड असलेला एक रसिक वर्ग आहे आणि तो टिकवणे हे चित्रकारांच्या हाती आहे.
संकेत सबनीस