या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : प्रसिद्ध दलाली पेढी व गुंतवणूक कंपनीत गुंतवणूकीतून सव्वा दहा टक्के व्याज देण्याचे आमीष दाखवून ७४ वर्षीय महिलेसह दोघांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी उत्तर प्रदेशात राहणाऱ्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने या कंपनीच्या नावाने बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा >>> महादेव बेटिंग ॲपप्रकरणात अभिनेता साहिल खानसह चौघांना समन्स

तक्रारदार महिला ७४ वर्षांच्या असून वांद्रे येथील रिबेलो रोड परिसरात राहतात. त्यांच्या पतीचे २०१७ मध्ये निधन झाल्यानंतर महिलेने त्यांच्या नावावरील सर्व समभाग विकून ती रक्कम विविध बँक खात्यात ठेवली होती. त्याच्या पतीसह काम करणारे अनिल कुमार गुप्ता यांच्याशी तक्रारदार महिलेचा परिचय होता. एप्रिल २०२२ मध्ये गुप्ता त्यांना राहत्या घरी भेटला. त्यावेळी तो सध्या प्रसिद्ध दलाली पेढीत काम करत असल्याचे त्याने सांगितले. त्यांनी दलाली पेढीमध्ये गुंतवणूक केल्यास सव्वा दहा टक्के व्याज मिळेल, असे सांगितले. या महिलेचे इतर नातेवाईकही गुंतवणूकीसाठी तयार झाले. त्यांनी मिळून गुप्ता यांच्याकडे दोन कोटी ७१ लाख रुपये जमा केले. त्या बदल्यात गुप्ताकडून साडे सहा लाख व साडे १३ लाख रुपये प्राप्त झाले. त्यानंतर उर्वरीत रकमेबाबत गुप्त उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर कतारवरून आलेल्या महिलेच्या मुलाने जाऊन दलाली पेढीमध्ये चौकशी केली असता त्यांच्या आईच्या नावावर केवळ ६० लाख रुपयेच जमा झाल्याचे समजले. तसेच तक्रारदार महिलेला पैसे जमा केलेली रकमेसाठी दिलेली पोच पावतीही खोटी असल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार महिलेप्रमाणे ७१ वर्षीय व्यक्तीचीही आरोपीने ५७ लाखांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. अखेर दोघांनी याप्रकरणी वांद्रे पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक व बनावट कागदपत्र बनवल्याप्रकरणी गुप्ताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार दोघांची मिळून दोन कोटी ४९ लाख रुपयांचा अपहार केला आहे. त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.