लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : हाँगकाँगमध्ये असह्य थंडी असल्यामुळे काही दिवस कुटुंबियांपासून दूर मुंबईत एकटा राहण्यासाठी आलेल्या ८१ वर्षीय व्यक्तीला तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी डिजिटल अटक केली. यावेळी मानवी तस्करीच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याची भीती दाखवून वृद्ध व्यक्तीच्या बँक खात्यातून लाखो रुपये काढण्यात आले. याप्रकरणी सांताक्रुज पोलिसांनी अज्ञात तोतया सीबीआय अधिकार्याविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
सांताक्रुज येथील एस. व्ही, रोडवरील एका आलीशान अपार्टमेंटमध्ये ८१ वर्षांचे तक्रारदार राहत असून ते एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा हाँगकाँग येथे वास्तव्यास असून तो तेथेच नोकरी करीत आहे. अनेकदा ते मुलांसोबत तेथेच असतात. मात्र हाँगकाँगमध्ये असह्य थंडी असल्याने ते काही दिवसांपूर्वीच भारतात परत आले. तेव्हापासून ते त्यांच्या सांताक्रुज येथील घरी एकटे राहत होते. त्यांचा मुलगा त्यांना खर्चासाठी पैसे पाठवत होता. तसेच नोकरीवर असताना त्यांनीही बचत केली होती. सोमवार, ९ डिसेंबरला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला. या व्यक्तीने तो सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांचा आर्थिक गैरव्यवहारासह मानवी तस्करीत सहभाग उघडकीस आला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना हाऊस अरेस्ट करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच दोन तासांनी त्यांचा मोबाइल बंद होईल, असेही त्याने सांगितले.
आणखी वाचा-नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
अटकेच्या कालावधीत त्यांना मोबाइलवरून कोणाशीही संपर्क साधता येणार नाही. त्यांनी तसे केल्यास त्यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करून तुरुंगात नेले जाईल,अशी भीती घालण्यात आली. या प्रकारामुळे ते प्रचंड घाबरले आणि अटकेच्या भीतीने त्यांनी कोणाशीही संपर्क साधला नाही. काही वेळानंतर संबंधित तोतया सीबीआय अधिकार्यांनी त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधला आणि त्यांना एका बँक खात्याची माहिती दिली होती. या बँक खात्यात दहा लाख रुपये हस्तांतरित करा, असे त्याने सांगितले. त्याची कुठलीही शहानिशा न करता त्यांनी संबंधित बँक खात्यात दहा लाख रुपये हस्तांतरित केले. रक्कम हस्तांतरित केल्यानंतर तक्रारदार व्यक्तीने तोतया सीबीआय अधिकाऱ्यांना दूरध्वनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मोबाइल बंद होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार सांताक्रुज पोलिसांना सांगून तोतया सीबीआय अधिकार्यविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा करून पोलिसांनी तोतया अधिकाऱ्याविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधत कायद्यातील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रारदाराच्या बँकेतून झालेल्या व्यवहारांची माहिती घेण्यात आली असून त्याच्या आधारे पोलीस अधिक तपास करीत आहेत.