डोंबिवली रेल्वे स्थानकातील मधल्या नवीन विस्तारित पुलावर गुरूवारी दुपारी साडे बारा वाजता शंकर मडवळ या ज्येष्ठ नागरिकाला चौघांनी लुटण्याचा प्रयत्न केला. याबाबतची तक्रार करण्यासाठी मडवळ रेल्वे पोलीस ठाण्यात गेले असता, त्यांना सीसी फुटेज पाहू, उद्या या असे सांगून त्यांचा गुन्हा दाखल न करता बोळवण केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांच्या या बेफिकीरीमुळे भुरटे चोर सरसावतात. त्याचे चटके प्रवाशांना बसतात, असे मडवळ यांनी सांगितले. मडवळ हे गुरूवारी दुपारी व्यायामशाळेतून घरी जात होते. मधुबन सिनेमा गल्लीतून ते नवीन रेल्वे जिन्यावर चढले. त्यावेळी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने काय काका कसे आहे. मी तुम्हाला ओळखतो असे सांगून भुरळ घातली. या गडबडीत या व्यक्तीने तीन साथीदारांसह मडवळ यांच्या हातातील घडय़ाळ, अंगठय़ा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सावध होऊन मडवळ तेथून निघून गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी घडला प्रकार मुलाला सांगितला. तात्काळ ते डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात आले. तुम्ही उद्या या, सीसी टीव्ही फुटेज बघू असे सांगून पोलिसांनी त्यांची बोळवण केली. दुसऱ्या दिवशी गेल्यावर फक्त नाव, पत्ता लिहून घेऊन शिवराम मडवळ यांना पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेताच घरी पाठवून दिले. पोलिसांची ही चालढकलीची कृती भुरटय़ा चोरांना पाठिशी घालत असल्याची टीका होत आहे.  

Story img Loader