मुंबई : मराठी समीक्षेत ‘पाटील स्कूल्स’चा ठसा उमटविण्यात मोलाचा वाटा असणारे ज्येष्ठ समीक्षक प्रा. गंगाधर पाटील (वय ९३) यांचे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. मराठी समीक्षेत वा. ल. कुलकर्णी, व. दि. कुलकर्णी, द. भि. कुलकर्णी अशा ‘कुलकर्णी स्कूल्स’चा दबदबा असताना अलिबागमधील ग्रामीण भागातील गंगाधर पाटील आणि म. सु. पाटील या दोन पाटलांनी ‘पाटील स्कूल्स’ निर्माण केले. प्रा. गंगाधर पाटील यांनी पाश्चात्त्य साहित्य विचार व समीक्षा मराठीत आणली. आदिबंधात्मक समीक्षा विचार मराठीत रुजवला तो ‘पाटील स्कूल्स’नेच. त्यात प्रा. गंगाधर पाटील यांचा मोलाचा वाटा होता.
कवितेची महत्त्वपूर्ण मीमांसा.
प्रा. पाटील यांनी ‘आलोचना’ मासिकातून समीक्षा लेखनाला सुरुवात केली. त्यांचे ‘अनुष्टुभ’ या वाङ्मयीन नियतकालिकातील ‘रेखेची वाहाणी’ या समीक्षापर सदराचे मराठी साहित्यवर्तुळात खूप कौतुक झाले. त्यांनी आदिबंधात्मक समीक्षेतून पु. शि. रेगे यांच्या कवितेची केलेली अभ्यासपूर्ण समीक्षा खूप गाजली.
समीक्षेचा गौरव..
पु. शि. रेगे यांच्या निवडक कवितांचे संपादन करून त्याला अभ्यासपूर्ण प्रस्तावनेची जोड देत ‘सुहृदगाथा’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. ‘आलोचना’, ‘मौज’, ‘अनुष्टुभ’, ‘पाऊलवाट’ या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह ‘समीक्षेची नवी रूपे’ , ‘समीक्षा मीमांसा’ आणि ‘कलाकृती आणि समीक्षा’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. समीक्षापर या तीनही पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
‘अनुष्टुभ’ला ओळख देण्यात वाटा..
प्रा. पाटील यांनी मराठी वाचकाला साहित्य समीक्षेच्या विविध सिद्धांतांचा परिचय करून दिला. ते ‘अनुष्टुभ’प्रतिष्ठानचे सभासद, विश्वस्त व अध्यक्ष होते. या काळात ‘अनुष्टुभ’ला मराठीतील उत्तम दर्जाचे वाङ्मयीन नियतकालिक म्हणून नावारूपाला आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. अतिशय मृदू, नम्र व्यक्ती म्हणूनही साहित्य वर्तुळात परिचित होते.
आदरांजली..
विद्यापीठाच्या मराठी विभागाचे हे भाग्यच
मानले पाहिजे की, पाटील सरांसारखा एक विद्वान या विभागाला लाभला. सरांचे साहित्य समीक्षेसंबंधीचे लेखन तीन पिढय़ांसाठी मार्गदर्शक ठरले. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना साहित्याच्या आकलनासाठी योग्य दृष्टी आणि समीक्षेसाठी नवा विचारव्यूह दिला.
– प्रा. पुष्पा राजापुरे , माजी मराठी विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ
गंगाधर पाटील यांनी मराठीला युरोपीय साहित्य विचाराची ओळख करून दिली. त्या काळात त्यांनी मराठी साहित्याला संरचनावाद, उत्तर संरचनावादाची दृष्टी दिली. या गोष्टी त्यांच्या लेखनात आणि शिकवण्यातही मुरलेल्या असत. त्यांच्यामुळे मराठी समीक्षेत चांगल्या प्रवृत्ती आल्या. ८० च्या नंतरच्या कालखंडात त्याचा मराठी समीक्षेवर खोलवर परिणाम झालेला दिसून येतो.
– डॉ. हरिश्चंद्र थोरात, ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक
आदिबंधात्मक समीक्षा ही समीक्षापद्धती गंगाधर पाटील यांनी मराठीत रूढ केली. पु. शि. रेगे यांच्या सुहृदगाथेची प्रस्तावना ही मराठीतल्या उत्कृष्ट
प्रस्तावनांमधील एक प्रस्तावना आहे. पु. शि. रेगे यांनी अनुष्टुभमध्ये सुरू केलेले ‘रेखेची वाहाणी’ हे सदर पुढे गंगाधरमामांनी सुरू ठेवले आणि ते खूप गाजले. आज मराठी समीक्षेत गांभीर्याने आणि अधिकाराने लिहिणारे अभ्यासक कमी होण्याच्या काळात गंगाधर पाटील यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी प्रकर्षांने जाणवते.
– नीरजा, कवयित्री
अफाट व्यासंग आणि विचारातला खुलेपणा हा स्थायीभाव असलेल्या पाटील सरांनी भारतीय आणि पाश्चात्त्य ज्ञानदृष्टींच्या आधारे आदर्शवत समीक्षा कशी आकार घेऊ शकते ते त्यांच्या लेखनातून सिद्ध करून दाखवले. मराठी नवसमीक्षेचे ते खरेखुरे नायक होते.
-विजय तापस, ज्येष्ठ समीक्षक