मुंबई : भारतातील आघाडीच्या वकिलांपैकी एक, बॉम्बे बार असोसिएशनचे (बीबीए) प्रमुख सदस्य असलेले ज्येष्ठ वकील इक्बाल छागला यांचे रविवारी दुपारी मुंबईत निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. स्वातंत्र्योत्तर भारतातील मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायमूर्ती एम. सी छागला यांचे ते पुत्र आणि सध्या उच्च न्यायालयात कार्यरत असलेले न्यायमूर्ती रियाज छागला यांचे ते वडील होत. गेल्या काही दिवसांपासून छागला यांची प्रकृती खालावली होती. रविवारी दुपारी त्यांचे निधन झाले. वरळी येथील स्मशानभूमीत सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सन १९३९ मध्ये जन्मलेल्या छागला यांनी केंब्रिज विद्यापीठातून इतिहास आणि कायदा या विषयातून पदव्युत्तर पदवी घेतली होती. त्यानंतर, १९७० मध्ये त्यांना बॉम्बे बार असोसिशनमध्ये पाचारण करण्यात आले आणि पुढे १९७९ मध्ये त्यांना वरिष्ठ वकिलाचा दर्जा देण्यात आला. छागला यांनी १९९० ते १९९९ या कालावधीत तीनवेळा बॉम्बे बार असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषवले. याशिवाय, त्यांनी बार असोसिएशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी समितीचे सदस्य आणि दिल्ली येथील राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे (एनएलएसए) सदस्य म्हणूनही काम केले होते.
छागला यांना सर्वोच्च न्यायालयाने एकदा, तर मुंबई उच्च न्यायालयाने दोनदा न्यायमूर्तीपदी नियुक्ती देऊ केली होती. परंतु, तिन्ही वेळेला त्यांनी ती नाकारली. ही संधी त्यांनी स्वीकारली असती तर ते देशाचे सरन्यायाधीश झाले असते. विधि क्षेत्राशी संबंधित एका वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलखातीत त्यांनी न्यायमूर्तीपदी नियुक्तीला नकार देण्याचे कारण स्पष्ट केले होते. ते सरन्यायाधीश झाले असते, तर त्यांच्या वाटेला १३ महिन्यांचा कार्यकाळ असता. त्यांच्या मते हा कार्यकाळ खूपच कमी होता. शिवाय, काही वैयक्तिक कारणांमुळेही त्यांनी आपण न्यायमूर्ती होण्यास नकार दिल्याचे म्हटले होते. परंतु, सरन्यायाधीश म्हणून अधिक कार्यकाळ मिळाला असला तर वैयक्तिक कारणे बाजूला सारून आपण न्यायमूर्तीपद नक्कीच स्वीकारले असते, असेही छागला यांनी या मुलाखतीत प्रामुख्याने नमूद केले होते.
उल्लेखनीय बाब म्हणजे १९९०च्या दशकात बॉम्बे बार असोसिशनच्या अध्यक्षपदी कार्यरत असताना छागला यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या राजीनाम्याची मागणी करणारे ठराव मांडले होते. कामाप्रतीची सचोटी आणि प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केले गेल्याने त्यातील काही न्यायमूर्तींनी राजीनामा दिला, तर काहींची बदली केली गेली. त्यानंतर, १९९५ मध्ये तर छागला यांनीच उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती ए. एम. भट्टाचार्य यांचा राजीनामा मागणारा आणखी एक ठराव मांडला. या ठरावानंतर वाढलेल्या दबावामुळे न्यायमूर्ती भट्टाचार्य यांनीही पदाचा राजीनामा दिला होता.
हेही वाचा – बृहतसूचीवरील पात्र भाडेकरुंना सशर्त ताबा, म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयातील कायदेशीर दिग्गजांपैकी एक मानले गेलेल्या छागला यांनी दिवाणी स्वरूपाची आणि कंपन्यांतील वादाशी संबंधित प्रकरणे प्रामुख्याने लढवली. त्यांच्या युक्तिवाद कौशल्यामुळे सर्वाधिक मागणी असलेल्या वकिलांपैकी ते एक होते. बॉम्बे बार असोसिएशनचे ते ६० वर्षे सदस्य राहिले. आंतरराष्ट्रीय लवादातही त्यांनी काम केले व परदेशी न्यायालयांमधील कार्यवाहीबाबत सल्ला दिला होता.