करोनाबाधितांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य वाळीत
इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता
मुंबई : येथे आजही शेजारधर्म जपतात, अडीअडचणीत लोक धावून जातात, इथले दरवाजे मदतीसाठी सताड उघडे असतात, अशी मुंबईच्या चाळींची ओळख आहे. चाळसंस्कृतीनेच माणूसकी जोपासली असेही म्हटले जाते. लालबागच्या चाळीत मात्र करोनाच्या युद्धात माणूसकीने मान टाकली आहे.
कु टुंबातील इतर सदस्य करोनाबाधित झाले म्हणून घरात एकटय़ा राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीला जेवणाचा डबा द्यायलाही इथले शेजारी घाबरत आहेत.
लालबागच्या एका चाळीतील तरुणाला करोना झाला होता. विमान कंपनीत काम करणाऱ्या या तरुणाला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची आई, पत्नी आणि लहान मुलगी यांच्या चाचण्याही पॉझिटिव्ह आल्या. या सर्वाना रुग्णालयात अलगीकरण करून ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र या तरुणाच्या वडिलांची चाचणी सुदैवाने निगेटिव्ह आली. त्यामुळे त्यांना घरातच विलगीकरण करून राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ते ज्या इमारतीत राहतात, ती इमारत सध्या प्रतिबंधित करण्यात आली आहे. या तरुणाच्या वृद्ध वडिलांची चाचणी नकारार्थी आली असली तरी त्यांचे सध्या जेवणाचेही हाल झाले आहेत. शेजारीपाजारी या कुटुंबाच्या दारातही येत नाहीत. त्यांची विचारपूसही करत नाहीत.
अखेर रुग्णालयात दाखल असलेल्या त्यांच्या मुलाने नगरसेवक अनिल कोकीळ यांना संपर्क साधून जेवणाची सोय करण्याची विनंती केली. त्यानंतर कोकीळ यांनी त्यांच्यासाठी डब्याची व्यवस्था केली आहे. मात्र रिकामा झालेला डबा खाली आणून देण्याचेही कष्ट कोणी घेत नसल्याची माहिती येथील एका कार्यकर्त्यांने दिली. दोरीला डबा बांधून ते रिकामा डबा खाली सोडत असल्याचे येथील रहिवासी सांगतात.
१४ दिवस इमारत प्रतिबंधित
या तरुणाच्या पत्नीचे माहेर परळच्या बेस्टच्या वसाहतीत आहे. ती काही दिवस तिथे राहायला आली होती. त्यामुळे बेस्टच्या वसाहतीतील एक इमारत प्रतिबंधित करण्यात आली होती. तिचे वडील बेस्टमध्ये वाहक असून तिच्या संपूर्ण कुटुंबाची चाचणी करण्यात आली होती. गुरुवारी तिच्या कुटुंबातील सर्वाचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे या वसाहतीतील लोकांचा धोका काहीसा टळला आहे. मात्र तरीही पुढील १४ दिवस ही इमारत प्रतिबंधित राहणार आहे. या इमारतीत बेस्टचे अनेक कर्मचारी असून त्यांनाही पुढील काही दिवस कामावर न येण्याचे आदेश बेस्ट प्रशासनाने दिले आहेत.