महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांच्यावर खेरवाडी येथील स्मशानभूमीत आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे सर्व आमदार उपस्थित होते. तसेच शिवसेना नेते संजय राऊत, भाजप नेते विनोद तावडे आणि आशिष शेलार यांनीही सरपोतदार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. आज सकाळी १० ते १२ पर्यंत सरपोतदार यांचे पार्थिव वांद्र्यातील खेरवाडीयेथील विनायक कॉलनीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंतिम दर्शनासाठी शिवसेना आणि मनसेमधील अनेक कार्यकर्ते आवर्जुन उपस्थित राहिले होते.    
अतुल सरपोतदार यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी शिल्पा आणि मुलगा जय असा परिवार आहे.
प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी सरपोतदार यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी त्यांना छातीत दुखू लागले. डॉक्टरांनी तपासण्या सुरू केल्या आणि त्याच वेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने साडे सातच्या सुमारास अतुल सरपोतदार यांचे निधन झाले. अतुल यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या पत्नी शिल्पा यांना प्रचंड मानसिक धक्का बसला व त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांच्यावर लीलावतीमध्ये उपचार करण्यात आले. अतुल यांच्या निधनाचे वृत्त समजताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाचे आमदार, पदाधिकाऱ्यांनी लीलावतीकडे धाव घेतली.
दिवंगत शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांचे अतुल हे पुत्र होत. राज यांनी शिवसेना सोडल्यानंतर अतुल यांनीही शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत मनसेत दाखल झाले.