ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ श्रीकांत रामकृष्ण परांजपे (वय ८०) यांचे शनिवारी दुपारी येथे हृदयविकाराच्या धक्क्य़ाने निधन झाले.  त्यांच्यामागे डॉ. सुनीता सोधी, डॉ. स्मिता पंत या दोन कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
अणू, उर्जा आणि वीज क्षेत्राचा गाढा अभ्यास असलेल्या परांजपे यांचा एन्रॉन प्रकल्पास ठाम विरोध होता. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या समितीच्या तांत्रिक विभागात त्यांचे महत्वाचे योगदान होते. या प्रकल्पासाठी लागणारा गॅस, त्याचे तंत्रज्ञान याचा विचार करता हा महागडा प्रकल्प देशाला परवडणारा नाही, असा अंदाज त्यांनी काही वर्षांपूर्वीच मांडला होता. त्याचे आता प्रत्त्यंतर येऊ लागले आहे. दाभोळ प्रकल्प गॅसपुरवठय़ाभावी बंद पडला आहे, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.
कल्पकम येथील ‘इंदिरा गांधी सेंटर फॉर अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’ चे संचालक म्हणून परांजपे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. ‘फास्ट रीडर रिअ‍ॅक्टर’चे ते जनक होते. अणुक्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल श्रीकांत परांजपे यांना तीन वर्षांपूर्वी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ होमी भाभा यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

Story img Loader