मृत्यूनंतर वारसाचा पालिकेतील नियुक्तीचा मार्ग मोकळा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसाद रावकर

मुंबई : राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई महापालिकेतील गट ‘क’, ‘ड’प्रमाणेच आता ‘अ’ आणि ‘ब’मधील अधिकारी कर्मचाऱ्यांचा अनुकंपा नियुक्ती धोरणात समावेश करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याबाबतचे परिपत्रकही जारी केले आहे. परिणामी, आता सहआयुक्त, मुख्य लेखापरीक्षक, उपायुक्त, साहाय्यक आयुक्त, खातेप्रमुख आदी पदावरील अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यास वा वयाची पन्नाशी पूर्ण होण्यापूर्वी शारीरिकदृष्टय़ा असमर्थ ठरल्यास त्यांच्या पात्र वारसाला पालिकेच्या सेवेत रुजू होता येणार आहे.

मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा तत्त्वाचे धोरण आखले होते. या धोरणानुसार समस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पात्र वारसाला पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात येत होते. पात्रतेनुसार संबंधित वारसाला नोकरी देण्यात येत होती. मात्र काही वर्षांपूर्वी या धोरणातून गट अ आणि ब मधील अधिकारी आणि त्याखालील काही पदांवरील कर्मचाऱ्यांना या धोरणातून वगळण्यात आले होते. त्या वेळी पालिका कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली होती.

करोनाकाळात पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक होती. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबर पालिकेतील सर्वच पालिका अधिकारी, कर्मचारी करोनाकाळात कर्तव्यावर उपस्थित होते. करोनाविषयक कामे करताना अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने गट क आणि ड प्रमाणे गट अ आणि ब मधील कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू करण्याचे शासन निर्णय जारी केला होता. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून त्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

पालिका कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास वा वयाची पन्नास वर्षे पूर्ण होण्यापूर्वी वैद्यकीय मंडळाने शारीरिकदृष्टय़ा असमर्थ ठरविल्यास माजी कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला प्रचलित पद्धतीनुसार गट क मधील कार्यकारी साहाय्यक (लिपिक), कनिष्ठ लेखा परीक्षा व लेखा साहाय्यक या पदावर, तसेच गट ड मधील कार्यालयीन शिपाई, कामगार, कक्ष परिचर, आया, हमाल पदावर शैक्षणिक आर्हता विचारात घेऊन अनुकंपा नोकरी देण्यात येणार आहे.

करोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन अनुकंपा नियुक्ती धोरण पूर्वलक्षी प्रभावाने १ जानेवारी २०२० पासून लागू करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार कार्यवाही करावी, असे आदेश आयुक्तांनी खातेप्रमुख, रुग्णालयप्रमुखांना दिले आहेत. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा मृत अधिकाऱ्यांच्या वा वयाच्या पन्नाशीपूर्वीच शारीरीकदृष्टय़ा असमर्थ ठरणाऱ्या कर्मचाऱ्याच्या वारसाला पालिकेचे दरवाजे खुले झाले आहेत.

या अधिकाऱ्यांचा धोरणात समावेश

गट अ- सहआयुक्त, पालिका मुख्य लेखापरीक्षक, उपायुक्त, साहाय्यक आयुक्त, करनिर्धारक व संकलक, प्रमुख लेखापाल, शिक्षणाधिकारी, विधि अधिकारी, पालिका चिटणीस, उद्यान अधीक्षक, अनुज्ञापन अधीक्षक, प्रमुख कामगार अधिकारी, प्रमुख चौकशी अधिकारी, प्रमुख सुरक्षा अधिकारी, उपप्रमुख लेखापाल आदी.

गट ब- प्रमुख जनसंपर्क अधिकारी, उपविधी अधिकारी, पालिका उपचिटणीस, सह प्रमुख कामगार अधिकारी, सह प्रमुख कर्मचारी अधिकारी, मुख लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षक आदी.