मुंबईः गुन्हे शाखेने वांद्रे परिसरात केलेल्या कारवाईत २८६ किलो गांजाचा साठा जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीविरोधात यापूर्वी चोरीचे आठ गुन्हे दाखल आहेत. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे ७२ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वांद्रे परिसरात सराईत आरोपी गांजाची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-९ च्या पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी दोन पथके स्थापन केली व त्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार या पथकांनी वांद्रे रिक्लेमेशन परिसरातील के. सी. रोडवरील ट्रान्झिट कॅम्पमधील चाळ क्रमांक ३० येथे सापळा रचला.
चाळीतील खोली क्रमांक ६ मध्ये आरोपीने अमली पदार्थ लपवले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे आरोपी इम्रान कमलुद्दीन अन्सारी (३६) अमली पदार्थांसह सापडला. घटनास्थळावरून पोलिसांनी २८६ किलो ६८० ग्रॅम गांजा जप्त केला असून या गांजाची किंमत ७० लाख रुपये आहे.
गेल्या अनेक दिवसांमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमणात गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा कलम ८ (क), २० (ब), ii (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला याप्रकरणी बुधवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. याप्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष-९ करीत आहे.
वांद्रे ते दक्षिण मुंबईपर्यंत गांजाची विक्री
प्राथमिक तपासात आरोपी गांजाच्या विक्रीत सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले. वांद्रेपासून अगदी दक्षिण मुंबईपर्यंत आरोपी गांजाचे वितरण करायचा. त्यामुळे गांजाचा साठा करण्यासाठी आरोपी इम्रानने भाडे तत्त्वावर ती खोली घेतली होती. गेल्या अनेक दिवसांपासून तो गांजाची विक्री करीत असल्याचा संशय असून तो कोणाकडून गांजा खरेदी करायचा, तसेच कोणाला विकायचा याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आरोपीविरोधात ८ गुन्हे
आरोपी इम्रान अन्सारी हा ताडदेव येथील तुळशीवाडी परिसरातील नगिना मशीद गल्ली परिसरात राहतो. तो सराईत आरोपी असून त्याच्याविरोधात यापूर्वी चोरी व जबरी चोरीचे आठ गुन्हे दाखल आहेत. व्यावसायाने चालक असलेला अन्सारी गेल्या काही दिवसांपासून गांजा विक्रीमध्ये सक्रिय होता.