सहकारी मंत्र्यांबरोबरच आमदारांच्या नाराजीनंतर प्रशासनात साफसफाई करण्याची मोहीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक तीव्र केली असून काही दिवसांपूर्वी ७०हून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानतंर मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी पोलीस दलातही मोठय़ा प्रमाणात फेरबदल केले आहेत. पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त दर्जाच्या तब्बल ७०हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात भारतीय पोलीस सेवेतील काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत ठाण मांडून बसलेल्या पोलीस उपायुक्तांना ग्रामीण भागांत पाठवण्यात आले असून ग्रामीण भागांमधील पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईत आणण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांचे प्रवक्ते आणि प्रकटीकरण विभागाचे उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांची दहशतवाद विरोधी पथक मुंबईचे पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आले आहे. मुंबईच्या परिमंडळ-५चे पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांची बदली ठाणे ग्रामीण येथे पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. त्याशिवाय परिमंडळ-१२चे उपायुक्त रामकुमार हे नागपूर येथील राज्य राखीव पोलीस दल (गट क्रमांक ४)ची जबाबदारी सांभाळतील. नुकतेच सायबर गुन्हे विभागाच्या उपायुक्तपदी आलेले राजकुमार यांचीही बदली करण्यात आली आहे. आता ते नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त म्हणून कारभार पाहतील. तसेच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त एन. डी. चव्हाण यांची बदली सोलापूर येथे शहर उपायुक्तपदी करण्यात आली आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांची नियुक्ती गडचिरोली येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. मुंबई परिमंडळ-४चे उपायुक्त अशोक दुधे यांची बदली मुंबई पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे.मुंबईतून बाहेर गेलेल्या अधिकाऱ्यांबरोबरच मुंबईत आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नवी मुंबई शहराचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांचा समावेश आहे. तसेच ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांची बदली मुंबईच्या परिमंडळ-७च्या पोलीस उपायुक्तपदी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा