मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यावर यापूर्वी सरकार पातळीवर होणारी धावपळ, मंत्र्यांची राळेगणसिद्धीकडे धाव, चर्चेच्या फेऱ्या, अण्णांचे मन वळविण्यासाठी होणारे प्रयत्न हे यंदा काहीच चित्र नव्हते. हजारे यांचा उपोषणाचा इशारा महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने तेवढा गांभीर्याने घेतला नव्हता.
अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यावर यापूर्वी सारी सरकारी यंत्रणा खडबडून जागी होत असे. मग अण्णांचे मनपरिवर्तन करण्याची जबाबदारी काही मंत्री व सचिवांवर असे. या मंत्र्यांचे राळेगणसिद्धीला दौरे व्हायचे. अण्णांशी चर्चा व वाटाघाटीच्या फेऱ्या होत असत. उपोषण पुढे ढकलावे म्हणून विनंती. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले जात असे. अण्णांची मंत्रालयात मुख्यमंत्र्यांबरोबर दोन-तीन तास चालणारी बैठक. हे नेहमीचे दृश्य असे. या वेळी तसे काहीच घडले नाही.
शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात महादेव शिवणकर, शशिकांत सुतार, बबन घोलप, शोभाताई फडणवीस हे मंत्री, लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सुरेश जैन, नवाब मलिक या मंत्र्यांना अण्णा हजारे यांच्या आरोपांनंतर राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा अण्णांची सरकारदरबारी जाम दहशत होती. अण्णांनी एखादे पत्र किंवा जाहीरपणे इशारा दिल्यास त्याची तात्काळ सरकारदरबारी दखल घेतली जात असे. आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री विलासकाका पाटील यांच्याकडे अण्णांनी इशारा दिल्यावर त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी असे. आझाद मैदानातील अण्णांच्या उपोषणाच्या वेळी तर तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह सारी सरकारी यंत्रणा ते लवकर संपावे म्हणून दिवसरात्र प्रयत्नशील होती. मोदी सरकारच्या काळातही अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीत उपोषण केले असता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत धाव घ्यावी लागली होती. नंतर नंतर अण्णा हजारे उपोषणाचा फक्त इशारा देतात, असे सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. वाईन विक्रीच्या विरोधात अण्णांनी उपोषणाचा इशारा दिल्यावर महाविकास आघाडी सरकारने तो फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. या वेळी अण्णांची समजूत काढण्यासाठी एकाही मंत्र्याचे राळेगणसिद्धीला पाय लागले नाहीत. अण्णांची भेट घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी राळेगणसिद्धीला जावे, असे उच्चपदस्थांच्या पातळीवर ठरले होते. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर- सिंग , नाशिकचे पोलीस महानिरीक्षक व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांशी सविस्तर चर्चा केली होती.
उपोषणाचा निर्णय स्थगित
नगर: किराणा दुकानातून वाईन विक्री करणार नाही तसेच वाईन विक्रीचा निर्णय जनतेला विचारात घेऊन करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्या, सोमवारपासून सुरू होणारे नियोजित उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. राळेगण सिद्धी (ता. पारनेर) येथे आज, रविवारी दुपारी झालेल्या ग्रामसभेत हजारे यांनी हा निर्णय जाहीर केला. कार्यकर्ते व ग्रामसभा यांच्या आग्रहानुसार उपोषण स्थगित करत असल्याचे त्यांनी सांगितले.