वाडिया रुग्णालयातील उपचारांनंतर हालचाल सुरू
नांदेड येथील आठ वर्षांच्या मुलाचा सर्पदंशामुळे अधू झालेला हात ‘मायक्रोव्हॅस्क्युलर’ शस्त्रक्रियेने पुन्हा कार्यान्वित करण्यात डॉक्टरांना यश आले. वाडिया रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
नांदेड येथील ताल्हा उमर शेख (८) कपाटामागील खेळणी काढण्यास गेला. तेव्हा अडगळीत दडून बसलेल्या सापाने ताल्हाच्या हाताला दंश केला. स्थानिक डॉक्टरांनी प्रतिबंधात्मक उपचार केले, मात्र काही दिवसांनी ताल्हाच्या डाव्या मनगटाजवळ सूज आली. तिथे सेल्युलायटिसचा संसर्ग झाला. डावा हात कोपरातून काढून टाकावा, असा सल्ला डॉक्टरांनी शेख दाम्पत्याला दिला.
पालकांनी ताल्हाला मुंबईतील सरकारी रुग्णालयात आणले. हात वाचविण्यात यश आले खरे, मात्र मनगटापासून कोपरापर्यंत व्यंग निर्माण झाले आणि हात अधू झाला. अधू हातावर उपचार करण्यासाठी पालक वाडिया रुग्णालयात आले. डाव्या हाताच्या पृष्ठभागावरील त्वचा व स्नायूंच्या ऊती (नेक्रॉसिस) नष्ट झाल्या होत्या. त्यामुळे मायक्रोव्हॅस्क्युलर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मुलांवर ही शस्त्रक्रिया करणे गुंतागुंतीचे असल्याचे वाडिया बालरुग्णालयातील प्लास्टिक, हँड आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई यांनी सांगितले. हातावरील जाड थर कापण्यात आला. आकुंचीत झालेले डावे मनगट मोकळे करण्यात. डाव्या मांडीवरील त्वचा व ऊतींचा पट्टा काढण्यात आला. रक्तवाहिन्या मायक्रोव्हॅस्क्युलर तंत्राने हाताच्या रक्तवाहिन्यांशी जोडल्या, असे डॉ. सातभाई यांनी सांगितले.
१२ नोव्हेंबर रोजी ताल्हाला सर्पदंश झाला. त्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी वाडिया रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्याच्या बोटांची हालचाल सुरू झाली आहे. ही दुर्मीळ शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि सुविधा वाडिया रुग्णालयात उपलब्ध असल्याचे रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले. ताल्हाचा हात पूर्ववत होऊ लागल्याने शेख कुटुंब आनंदात आहे.