ग्रीसमधील राजकीय अनिश्चिततेने ‘युरोझोन’च्या एकात्मतेपुढे आणलेले प्रश्नचिन्ह आणि प्रति पिंप ५० डॉलरखाली गटांगळी घेतलेल्या कच्च्या तेलाच्या किमती या जागतिक चिंतांनी मंगळवारी शेअर बाजाराला चांगलेच हादरे दिले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने साडेपाच वर्षांतील सर्वात मोठी ८५५ अंशांची आपटी खाल्ली. बाजाराच्या घसरणीस जागतिक घडामोडी कारणीभूत असल्या तरी ही घसरण कायम राहिली तर केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणांना खीळ बसू शकते.
ग्रीसमध्ये होत असलेल्या निवडणुकीत संभाव्य सत्तांतरामुळे हा देश तेथील सामाईक युरो चलन असलेल्या १९ राष्ट्रांच्या ‘युरोझोन’ युतीमधून बाहेर पडण्याची अटकळ आहे. याचा फटका युरोपीय मध्यवर्ती बँकेकडून केल्या जाणाऱ्या आर्थिक सुधारणांना बसण्याची भीती आहे. याच भीतीने मंगळवारी ‘युरो’ हे चलन नऊ वर्षांपूर्वीच्या निचांकाला घसरले. दुसरीकडे, इराक व रशियाने कच्च्या तेलाचे विक्रमी उत्पादन घेतल्याचे वृत्त, अमेरिकेचे तेलउत्पादनातील स्वावलंबन आणि जागतिक मंदीमुळे घटती मागणी या पाश्र्वभूमीवर, कच्च्या तेलाच्या दरांची घसरण सुरूच आहे. याचा फटका जगभरातील भांडवली बाजारातील ऊर्जा कंपन्यांच्या समभागांना बसला.

‘अच्छे दिन’ अडचणीत
जागतिक घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारांतील घसरण सुरूच राहिली तर याचा परिणाम देशाच्या एकंदर अर्थव्यवस्थेला भोगावा लागणार आहे. मे महिन्यात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच बाजारात इतक्या मोठय़ा प्रमाणात नकारात्मकता दिसून येत आहे. विशेष म्हणजे, चालू आर्थिक वर्षांतील वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सार्वजनिक उपक्रमांतील समभागांच्या विक्रीतून भांडवल उभे करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यामुळे खीळ बसू शकते. याचा थेट फटका सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या अंमलबजावणीला बसेल.

* सेन्सेक्सच्या ५०० अंशांच्या घसरणीने मंगळवारच्या व्यवहाराची सुरुवात झाली.
* मध्यान्हानंतर युरोपीय बाजार घसरणीसह उघडल्याचे पाहून सेन्सेक्स ९०० हून अधिक अंशांनी गडगडला.
* निफ्टी निर्देशांकही २५० अंशांच्या आपटीने केविलवाण्या ८,१०० स्तरावर परत फिरला .
* यापूर्वी एकाच व्यवहारात ८६९.६५ अशी सर्वात मोठी सेन्सेक्स घसरण ६ जुलै २००९ मध्ये नोंदली गेली आहे.
*२.९० लाख कोटी रुपयांचा फटका गुंतवणूकदारांना बसला

Story img Loader