मुंबई : विक्रीच्या जोरदार लाटेचा भयंकर तडाखा बसून सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी २०२५ वर्षातील सर्वात वाईट घसरगुंडी शुक्रवारी नोंदवली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चिनी उत्पादनांवर अतिरिक्त १० टक्के शुल्क लादण्याच्या ताज्या घोषणेनंतर झालेल्या जागतिक भांडवली बाजारांतील पडझडीचे अधिक भीषण प्रतिबिंब स्थानिक बाजारात उमटताना दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सप्ताहअखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १,४१४.३३ अंशांनी म्हणजेच १.९० टक्क्यांनी घसरून ७३,१९८.१० पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने १,४७१.१६ अंश गमावत ७३,१४१.२७ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये सलग आठव्या सत्रात घसरण झाली आणि तो ४२०.३५ अंशांनी (१.८६ टक्के) घसरून २२,१२४.७० पातळीवर बंद झाला.

विश्लेषकांच्या मते, परदेशी निधीचे सतत होणारे निर्गमन आणि अमेरिकेच्या व्यापार धोरणांच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत. कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारात मंदीची भावना होती आणि त्यामुळेच सुरू झालेल्या चौफेर विक्रीतून मोठी पडझड झाली. येत्या आठवड्यात कॅनडा आणि मेक्सिकोमधून अमेरिकेच्या आयातीवर २५ टक्के कर लागू होण्याची भीती आणि चिनी वस्तूंवर १० टक्के अतिरिक्त कर लागू होण्याची शक्यता ही जागतिक व्यापारयुद्धाला तोंड फोडणारी ठरेल, अशी गुंतवणूकदारांमध्ये भीती आहे.

जागतिक व्यापारविश्वातील तणाव आणि अनिश्चितता एकीकडे वाढली आहे. दुसरीकडे देशांतर्गत कंपन्यांच्या तिमाही मिळकत कामगिरीने केलेली निराशा आणि ग्राहक मागणीतील मरगळ तसेच खासगी क्षेत्रातून आटलेली गुंतवणूकही निरुत्साह वाढविणारी आहे. विदेशी गुंतवणूकदारांच्या निरंतर विक्रीमागेही हीच प्रमुख कारणे आहेत. तीव्रपणे झडत असलेले रुपयाचे मूल्य या विक्रीला अधिकच उत्तेजन देणारे ठरले आहे, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी सद्या:स्थितीचे निरीक्षण नोंदविले.

विकासवेग तिसऱ्या तिमाहीत ६.२ टक्क्यांवर

उत्पादन आणि खाण क्षेत्रांच्या सुमार कामगिरीमुळे आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन दर (जीडीपी) ६.२ टक्के नोंदवला गेला, असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. सरकारने संपूर्ण आर्थिक वर्षासाठी वाढीचा अंदाज सुधारून ६.५ टक्क्यांपर्यंत वाढविला असला तरी तोही चार वर्षातील नीचांक नोंदविणारा असेल.

७.४६ लाख कोटींची संपत्ती लयाला

●जागतिक बाजारातील मंदीचा कल आणि व्यापारयुद्धाच्या भीतीने देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावला. परिणामी एका सत्रात गुंतवणूकदारांचे ७.४६ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले.

●अर्थात तीव्र घसरणीनंतर मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ७.४६ कोटी रुपयांनी घसरून ३८५.६३ लाख कोटी (४.४२ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स) रुपयांपर्यंत खाली आले.