मुंबई : मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असून या कोळीवाड्यांचे अस्तित्व आणि त्यांचे वैशिष्ट जपण्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करावी लागणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. कोळीवाड्यांच्या विकासासाठी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली असून त्यात या विषयावर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत ४१ कोळीवाडे व ८८ गावठाणे असून कोळीवाडे आणि गावठाण्यात वास्तव्यास असलेले नागरिक मूळ रहिवासी आहेत. हे कोळीवाडे म्हणजे जुन्या मुंबईची ओळख आहे. या कोळीवाड्यांचा विकास करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. कोळीवाड्यांची, तेथील घरांची विशिष्ट रचना असते, त्यांची खास संस्कृती आहे. कोळीवाड्यांचे एक खास सौंदर्य आहे. हे सौंदर्य, ओळख टिकवून ठेवून हा विकास करावा लागणार आहे. त्यामुळे कोळीवाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) तयार करण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले. महानगरपालिका मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

हेही वाचा – “पाकिस्तानी कलाकारांना विरोध ही देशभक्ती नव्हे”; बंदीची मागणी फेटाळताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

पुनर्विकासात किती एफएसआय द्यावा, कसा विकास असावा इतर बाबींसाठी नवीन डीसीआर तयार केले जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता मार्गी लागेल, अशी माहिती मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिली. तसेच कोळीवाड्यात राहणाऱ्यांना सोयी-सुविधाही देता येतील, या दृष्टीने ही नियमावली परिपूर्ण असेल, असेही ते म्हणाले.

येत्या सोमवारपासून मुंबईतील सर्व कोळीवाड्यांना संबंधित अधिकाऱ्यांसमवेत भेटी देऊन आढावा घेतला जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले. कोळीवाड्यांचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोळीवाडे बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना तिथेच खानपानाची व निवासाचीही सुविधा मिळू शकेल, अशीही माहिती त्यांनी दिली.

मुंबईत सुमारे ८८ गावठाणे व ४१ कोळीवाडे असून मागील अनेक वर्ष पुनर्विकास रखडला आहे. त्‍यांना आपल्‍या राहत्‍या घराची दुरुस्‍ती व डागडुजी करतानाही अडचणी येतात. त्यामुळे मूळ मुंबईकरांच्‍या पुनर्विकासासाठी स्‍वतंत्र विकास नियंत्रण नियमावली असावी, तसेच त्‍यांना अतिरिक्‍त एफएसआय देण्‍यात यावा, कोळवाडे आणि गावठाणांचे सिमांकन करण्‍यात यावे. इमारतींचा पुनर्विकास करताना उंचीची मर्यादा असल्‍यामुळे विकास करताना अडचणी येतात. त्‍यासाठी या इमारतींसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली असावी, अशी मागणी रहिवासी मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत.

हेही वाचा – दांडियाच्या ३०० रुपयांच्या बनावट पासमुळे सात वर्षांच्या शिक्षेची शक्यता

कोळीवाड्यांना सोमवारपासून भेटी देणार

मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासाबरोबर येथे पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. येथे येणार्‍या देशी-परदेशी पर्यटकांना वैशिष्ट्यपूर्ण कोळी पदार्थांचा आस्वाद घेता येईल. तसेच संस्कृती-परंपरेचे दर्शन घडणार आहे. येथे राहण्याची व्यवस्थाही केली जाणार आहे. महानगरपालिकेकडून यासाठी प्रायोगिक तत्त्वावर कफ परेड, वरळी आणि माहीम कोळीवाड्यात उपक्रम राबवला जाणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Separate development control regulations for development of koliwada inform guardian minister deepak kesarkar mumbai print news ssb