कुलदीप घायवट, लोकसत्ता
मुंबई : गजबजलेल्या धारावीत नानाविध प्रकारच्या वनस्पती, पक्ष्यांनी बहरलेल्या निसर्ग उद्यानात आता फुलपाखरांसाठी स्वतंत्र बाग तयार करण्यात येणार आहे. या भागात ८५ हून अधिक प्रजातींची फुलपाखरे आढळून येतात. फुलपाखरांसाठी योग्य अशा मधुरस देणाऱ्या वनस्पतींची लागवड येथे प्राधान्याने करण्यात येणार आहे.
धारावीमधील मिठी नदीच्या तीरावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संचालित महाराष्ट्र निसर्ग उद्यान केंद्र १९९४ पासून उभे आहे. पूर्वी कचराभूमी असलेल्या भागात महाराष्ट्र निसर्ग उद्यान साकारण्यात आले आहे. उद्यानात वर्षभरात ८५ हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती आढळत होत्या. मात्र, अलीकडे फुलपाखरांच्या प्रजातींची संख्या ४० वर आली आहे. दापोली येथील वनशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी सोहम सोनवणे यांनी जुलै २०२२ मध्ये केलेल्या अभ्यासात २५ फुलपाखरू प्रजातींची नोंद केली. या परिसरातील फुलपाखरांची संख्या वाढवण्यासाठी फुलपाखरांचे खाद्य असलेल्या वनस्पती, मधुरस देणाऱ्या वनस्पतींची लागवड करण्यात येत आहे. सध्या उद्यानात सोनचाफा, सीताफळ, कढीपत्ता, बेल, लिंबू, नारळ, आंबा, केळी, बांबू, कृष्णकमळ, कण्हेर, पाणफुटी आणि पेरू अशा खाद्य वनस्पती आहेत. त्याचबरोबर रुई, लांब पानकुसुम, पानफुटी, स्टार क्लस्टर, सदाफुली, मोगली एरंड, इक्सोरा कोक्सीनिया, सदाफुली, घाणेरी, इक्सोरा, निर्गुडी, तुळस, जास्वंद, गोकर्ण, दगडी पाला, चित्रक आणि पेंटास या मधुरस देणाऱ्या वनस्पती उद्यानात लावण्यात येत आहेत. त्यामुळे फुलपाखरांच्या प्रजातींमध्ये वाढ होईल, असा विश्वास येथील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
उद्यानात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजाती
ब्लू मॉरमॉन, कॉमन पामफ्लाय, प्लेन टायगर, ब्लू टायगर, स्ट्रीप्ड टायगर, कॉमन मॉरमॉन, चॉकलेट पॅन्सी, रेड पिओरेट, टाऊनी कोस्टर, लाइम बटरफ्लाय जुलै महिन्यांत करण्यात आलेल्या पाहाणीत २५ आणि सध्या ४० प्रजातींची नोंद आहे. यासह उद्यानात फुलपाखरांच्या प्रजातींची संख्या वाढावी यासाठी मधुरस आणि खाद्य देणाऱ्या वनस्पतींची लागवड मोठय़ा संख्येने करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात फुलपाखरांच्या प्रजातींची संख्या वाढण्याची आशा आहे.
– युवराज पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, महाराष्ट्र निसर्ग उद्यान