मुंबई : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ असणाऱ्या आमिर खान यांची मुख्य भूमिका असलेला व अल्लू अरविंद प्रस्तुत ‘गजनी’ या हिंदी चित्रपटाने २००८ साली तिकीट खिडकीवर दमदार कामगिरी करीत भारतात १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवणारा पहिला हिंदी चित्रपट ठरण्याची किमया साधली होती. ‘तंडेल’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचच्या निमित्ताने अल्लू अरविंद यांनी ‘गजनी’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आणि आमिर खान यांच्यासोबत १ हजार कोटींचा व्यवसाय करणाऱ्या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती करण्याची इच्छाही व्यक्त केली. तसेच हा मोठ्या स्तरावरील चित्रपट ‘गजनी’चा सिक्वेल ‘गजनी २’ असू शकतो, अशी शक्यताही वर्तविली आहे.
दरम्यान, अल्लू अरविंद यांच्या वक्तव्याला आमिर खान यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सध्या समाजमाध्यमांवर ‘गजनी’च्या सिक्वेलबाबत प्रचंड चर्चा असून प्रेक्षकांना उत्सुकता असल्याचे सांगितले. त्यामुळे अल्लू अरविंद आणि आमिर खान यांची भेट झाल्यानंतर ‘गजनी’चा सिक्वेल येण्यासंदर्भात प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
चंदू मोंडेटी दिग्दर्शित आणि अल्लू अरविंद प्रस्तुत ‘तंडेल’ या चित्रपटाची कथा मच्छीमारांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात नागा चैतन्यने श्रीकाकुलम हे पात्र साकारले आहे, तर त्याच्यासह मुख्य भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे. या चित्रपटात नागा चैतन्यदेखील एक मच्छीमार आहे. तर बनी वासू यांनी निर्मात्याची आणि देवी श्री प्रसाद यांनी संगीतकाराची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून तेलुगू, तमिळ आणि हिंदी या भाषेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा प्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी मुंबईत पार पडला. यावेळी चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी हजेरी लावली होती. तसेच ‘तंडेल’ या चित्रपटाचा ट्रेलर उत्तम असून संगीतही अप्रतिम आहे, असे आमिर खान यांनी आवर्जून सांगितले.