देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील सहा आमदारांविरुद्ध गुन्हेगारी स्वरुपाचे गंभीर, तर ११ आमदारांविरुद्ध किरकोळ गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असून त्यात मनसे, शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि सपाच्या आमदारांचा समावेश असल्याची माहिती एका पाहणी अहवालातून उजेडात आली आहे. तर महाराष्ट्राचा राज्यशकट हाकणाऱ्या काँग्रेसचे पाच आमदार नागरिकांच्या प्रश्नांना सभागृहात वाचा फोडण्यात निरुत्साही असल्याचे दिसून आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रजा फाऊंडेशनने मुंबईमधील ३२ आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून ३६ आमदार निवडून आले असून त्यापैकी चार आमदार मंत्रीपदावर विराजमान झाले. त्यामुळे मंत्र्यांना या पाहणीतून वगळण्यात आले.
प्रजा फाऊंडेशच्या पाहणीमध्ये मनसेचे बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर, राम कदम, शिशिर शिंदे, शिवसेनेचे रवींद्र वायकर आणि समाजवादी पार्टीचे अबू आजमी यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
काँग्रेसचे अशोक जाधव, कृपाशंकर सिंह, भाजपचे गोपाळ शेट्टी, मंगलप्रभात लोढा, प्रकाश मेहता, सरदार तारासिंग, शिवसेनेचे प्रकाश सावंत, सुभाष देसाई, विनोद घोसाळकर, मनसेचे मंगेश सांगळे, नितीन सरदेसाई यांच्याविरुद्ध किरकोळ गुन्हे दाखल झाल्याचे आढळून आले आहे.
विशेष म्हणजे काँग्रेसचे १२, तर राष्ट्रवादीच्या दोन आमदारांविरुद्ध एकही गुन्हा दाखल नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
आमदारांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नांची संख्या, गुणवत्ता, हजेरी, गुन्हेगारी पाश्र्वभूमी, कमी भ्रष्ट, मतदारसंघातील लोकांसाठी उपलब्ध आमि मतदारसंघात केलेली कामे या निकषांच्या आधारे प्रजा फाऊंडेशनने आमदारांची प्रगती पुस्तके तयार केली आहेत. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची प्रगती पुस्तके लाल रंगाच्या रेघोटय़ांनी भरली आहेत. मात्र केवळ गुन्हेगारी पाश्र्वभूमी नसल्यामुळे काँग्रेसच्या आमदारांना दिलासा मिळाला आहे.
आमदारांविषयी मते जाणून घेण्यासाठी ‘प्रजा’ने २५ हजार मतदारांशी संपर्क साधला होता, असे ‘प्रजा’चे संस्थापक विश्वस्त निताई मेहता यांनी सांगितले.
हिवाळी (२०११), अर्थसंकल्प (२०१२) आणि पावसाळी (२०१२) या अधिवेशनांमध्ये आमदारांनी केलेल्या कामगिरीचा, तसेच आमदारांनी नोव्हेंबर २०१२ ते मार्च २०१३ दरम्यान खर्च केलेल्या स्थानिक विकास निधीचा आढावा घेऊन प्रगती पुस्तक तयार करण्यात आल्याचे, ‘प्रजा’चे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांनी सांगितले.
योगेश सागर आघाडीवर
या पाहणी अहवालात भाजपचे आमदार योगेश सागर यांनी आघाडीचे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे अमिन पटेल यांनी दुसरा, काँग्रेसचे मुधकर चव्हाण यांनी तिसरा क्रमांक मिळविला आहे. पहिल्या दहा आमदारांमध्ये काँग्रेसच्या पाच, भाजपच्या दोन, शिवसेना दोन आणि मनसेच्या एका आमदाराचा समावेश आहे.
यांचा प्रश्नच नाही!
काँग्रेसचे आमदार बलदेव खोसा यांनी सभागृहात एकही प्रश्न उपस्थित न केल्यामुळे ते मुंबईमधील मौनीबाबा ठरले आहेत. तर चंद्रकांत हंडोरे (एक प्रश्न), कृपाशंकर सिंह (दोन), मिलिंद कांबळे (तीन), नवाब मलिक (१५) हे आमदारही प्रश्न विचारण्यात निरुत्साही असल्याचे आढळून आले.
गुन्हाही आणि सर्वाधिक प्रश्नांचे श्रेयहीमनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल असल्याचे या अहवालात नमूद आहे. त्याचबरोबर त्यांनीच सभागृहात सर्वात जास्त म्हणजे १,२९२ प्रश्न उपस्थित केल्याचे या पाहणी अहवालात म्हटले आहे.
सहा आमदारांविरुद्ध गंभीर गुन्हे, एक मौनीबाबा!
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील सहा आमदारांविरुद्ध गुन्हेगारी स्वरुपाचे गंभीर, तर ११ आमदारांविरुद्ध किरकोळ गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 13-08-2013 at 02:38 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serious allegation on six mla of maharashtra