वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जी२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. “१२ खर्व ४३ अब्ज ९८ कोटी ९७ लाख ५० हजार रुपये ही अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना भारतात आणण्याची किंमत आहे का?” असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारला. तसेच अमेरिकेतील भारतीयांकडून निवडणुकीसाठी जास्तीत जास्त पैसा ओढता यावा म्हणून रशियाला नाराज करून अमेरिकेची तळी उचलली जात आहे का? अशीही विचारणा केली. त्यांनी शनिवारी (९ सप्टेंबर) ट्वीट सूचक विधानं केली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “१२ खर्व ४३ अब्ज ९८ कोटी ९७ लाख ५० हजार रुपये! मिस्टर मोदी, अमेरिकन राष्ट्रपती जो बायडन यांना भारतात आणण्याची ही किंमत आहे का? मला असे सांगण्यात आले आहे की, अमेरिकी कंपन्यांना तुम्ही १२ खर्व ४३ अब्ज ९८ कोटी ९७ लाख ५० हजार रुपये इतक्या किमतीची संरक्षण कंत्राटे वाटणार आहात. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी जी२० परिषदेला येणं रद्द केलं असावं.”
“हिच रशियाची नाराजी पत्करून अमेरिकेची तळी उचलण्याची मजबुरी आहे का?”
“अमेरिकेच्या नेत्यांचे लांगूलचालन करून, त्यांना खुश करून अमेरिकेत जास्तीत जास्त प्रचार रॅली आणि टाऊन हॉल मीटिंग घेण्याची परवानगी मिळावी. जेणेकरून तिथे राहणाऱ्या भारतीयांकडून निवडणुकीसाठी जास्तीत जास्त पैसा ओढता यावा, हिच तुमच्या रशियाची नाराजी पत्करून अमेरिकेची तळी उचलण्याच्या नीती मागची मजबुरी आहे का?” असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारला.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी देशाची राजधानी दिल्लीत होत असलेल्या जी २० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ५ प्रश्न विचारले होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “कुठला विश्वगुरू अन् कसला विश्वगुरू. स्वतःला विश्वगुरूचं लेबल चिकटवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझे काही प्रश्न आहेत.”
प्रकाश आंबेडकरांनी मोदींना विचारलेले ५ प्रश्न
१. इंडोनेशियामध्ये झालेल्या एशियन (ASEAN) शिखर संमेलनात भाषण करताना नरेंद्र मोदींनी कितीदा चीनचा उल्लेख केला?
२. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिल्लीतल्या जी २० संमेलनाकडे (G20Summit) पाठ का फिरवली आहे, हे मोदी सांगू शकतील का?
३. रशिया आणि चीनला मान्य व्हावे म्हणून युक्रेन युद्धावरच्या परिच्छेदात भारताने सुचवलेले बदल अमेरिका, इंग्लंड, युरोपियन युनियन आणि इतर पाश्चिमात्य देशांनी धुडकावून लावले आहेत हे खरे आहे का?
हेही वाचा : “आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर…”; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
४. वर्षभराच्या अध्यक्षीय काळात चीन आणि रशियाचा विरोध पाहता युक्रेन युद्धाचा साधा उल्लेख असणारे किती संयुक्त निवेदने किंवा सर्वानुमते दस्तावेज निघाले?
५. दिल्लीतल्या संमेलनात कोणत्याच नेत्यांची घोषणा न होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे का? ज्यांच्या अध्यक्षतेखाली नेत्यांची घोषणा जाहीर होऊ शकली नाही, असा पहिला देश बनण्याची नामुष्की भारतावर ओढवणार आहे का? आणि यामुळे संपूर्ण जगात भारताची नाचक्की होणार नाही का?