एकीकडे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि अनेक आमदारांनी बंड केल्याने महाविकासआघाडी सरकार अस्थिर झालंय. दुसरीकडे आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “शिवसेनेच्या आमदारांनी अजित पवार त्रास देत असल्याचा आरोप केला. तीच बाब आमच्यासमोर देखील येत होती. अजित पवार यांनी आमच्या मंत्र्यांनाही त्रास दिला होता,” असा आरोप नाना पटोले यांनी केला. ते गुरुवारी (२३ जून) एबीपी माझाशी बोलत होते.
नाना पटोले म्हणाले, “शिवसेनेच्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अर्थमंत्री अजित पवार त्रास देत होते असा आरोप केला आहे. तीच बाब आमच्यासमोर देखील येत होती. आमच्या मंत्र्यांच्या विभागांना निधी न देणे, त्यांना त्रास देणे असंच काम होत होतं. त्यावरून आम्ही स्पष्टपणे असं चालणार नाही असं सांगायचो.”
“आमचे आपआपसात मतभेद नव्हते, आमचे मतभेद विकासासाठी”
“हे सरकार राज्यातील जनतेसाठी बनवण्यात आलंय, कोणत्याही गटासाठी नाही अशी आमची भूमिका होती. त्याचा विरोध आम्ही करत होतो. मला वाटतं हा विरोध स्वाभाविक आहे, तो राजकीय विरोध नाही. आमचे आपआपसात मतभेद नव्हते, आमचे मतभेद विकासासाठी होते,” असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं.
“आम्ही किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सरकार तयार केलं होतं”
“पहाटेचं सरकार कोसळलं आणि शिवसेना भाजपाची युती तुटली तेव्हा आम्ही किमान समान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडीचं सरकार तयार केलं होतं,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.
“गुजरात-आसाममधील भाजपा सरकारने शिवसेनेच्या अंतर्गत प्रकरणात तेल ओतलं”
नाना पटोले म्हणाले, “केंद्र सरकारने देशात अग्निपथ योजना आणून जसा तरुणांना त्रास दिलाय. तशाच पद्धतीने केंद्राने महाराष्ट्रात एक अग्निपथ तयार केलाय. ईडीची भीती दाखवून शिवसेनेला खिंडार पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गुजरात आणि आसाममधील भाजपा सरकारने शिवसेनेच्या अंतर्गत प्रकरणात तेल ओतण्याचं काम करत आहेत हे स्पष्ट आहे.”
“भाजपाकडे सरकार स्थापनेसाठी संख्याबळ नाही, हा सर्व दिखाऊपणा”
“टीव्हीवर जे पाहायला मिळत आहे त्यावरून एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठं संख्याबळ आहे. भाजपा एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत आहे. आता गोळी दागण्याची वेळ आली आहे तेव्हा भाजपा समोर का येत नाही? याचा अर्थ त्यांच्याकडे संख्याबळ नाही. हे सर्व दिखाऊपणा आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा अपेक्षाभंग करण्याचं पाप भाजपा करत आहे.