औरंगाबादमधील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाबत गंभीर आरोप केलाय. “शाहरुखचा मन्नत बंगला सरकारी जमिनीवर उभा आहे. त्याचा करार १९८१ मध्येच संपला आहे. मात्र, आजपर्यंत एकाही मुख्यमंत्र्यांनी हा करार पुनर्स्थापित केला नाही,” असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला. मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनींचं भाडं घेणं बंद झाल्यानं सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्याचाही आरोप त्यांनी केला. ते सोमवारी (२० जून) मुंबईत माध्यमांसमोर बोलत होते.
हर्षवर्धन जाधव म्हणाले, “मी उद्या दुपारी (२१ जून) माध्यमांशी बोलणार आहे. महाराष्ट्र राज्यात भाजपाचं, शिवसेनेचं, काँग्रेसचं सरकार असताना, राष्ट्रवादीचे सातत्याने उपमुख्यमंत्री असताना शेकडो एकर सरकारी जमीन अत्यल्प दराने भाड्याने देण्यात आलीय. यातील मोठ्या प्रमाणावरील जमिनींचं भाडं घेणं बंद झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि कर वाढला आहे.”
“कोणत्याही पक्षाचं सरकार जमिनींच्या भाड्याचे पैसे वसुल करायला तयार नाही. जर हे सगळे पैसे वसुल करण्यात आले तर महाराष्ट्र करमुक्त होऊ शकतो. या भाड्याने दिलेल्या जमिनींमध्ये अभिनेता शाहरुख खानचा देखील समावेश आहे. शाहरुखचा मन्नत बंगला सरकारी जमिनीवर उभा आहे. त्याचा करार १९८१ मध्ये संपला आहे. मात्र, १९८१ पासून २०२२ पर्यंत हा करार वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी अजूनही पुनर्स्थापित केलेला नाही,” असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला.
हेही वाचा : “आम्हाला एखाद्या राक्षसासारखं…”, NCB अधिकाऱ्यासमोर बोलताना शाहरुखला झाले अश्रू अनावर
यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. या निवडणुकीत सर्व सामान्यांना काय मिळणार आहे? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी यापेक्षा महत्त्वाचे विषय असल्याचं मत व्यक्त केलं.