शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप केला आहे. नार्वेकरांची केंद्रीय कायदामंत्र्यांबरोबर बंद दाराआड तीन तास बैठक झाली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार आहे हे त्यांना सांगण्यात आलं आहे का? असा सवाल संजय राऊतांनी केला. तसेच या बैठकीमुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहे, असंही राऊतांनी नमूद केलं. ते बुधवारी (१० मे) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “राहुल नार्वेकरांची कायदामंत्र्यांबरोबर बंद खोलीत तीन तास बैठक झाली. या बैठकीत कायदा मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार हे राहुल नार्वेकरांना सांगितलं आहे का? सर्वोच्च न्यायालय असा निर्णय देणार आहे, तुम्ही लंडन दौऱ्यावर जा म्हणून राहुल नार्वेकरांना कायदा मंत्र्यांनी सांगितलं का?”
“…तर या देशाची अवस्था फार गंभीर होईल”
“हा देश कायद्यानुसार, संविधानानुसार चालतो. कायदा आणि संविधान काय निर्णय घेतो हे आम्ही पाहणार आहोत. या देशात राजकीय व्यभिचाराला पाठिंबा दिला गेला, तर या देशाची अवस्था फार गंभीर होईल,” असा इशारा संजय राऊतांनी दिला.
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : Video: शरद पवारांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “सामनाला…”
“हे सर्व लोक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रभाव टाकत आहेत”
राऊत पुढे म्हणाले, “राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आहेत. आमदार अपात्रतेचा निर्णय माझ्याकडेच येईल, मी पाहून घेईन असं ते कसं म्हणू शकतात. ही कोणती दादागिरी आहे. याचा अर्थ हे सर्व लोक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रभाव टाकत आहेत.”
“…त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली”
“देशाचे कायदामंत्री राहुल नार्वेकरांबरोबर तीन तास बंद खोलीत चर्चा करतात. त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे,” असंही राऊतांनी नमूद केलं.