लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः पाच वर्षे आणि चार वर्षांच्या दोन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली. आरोपी नोकर असून मालक घरी नसताना त्याने मुलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याने प्रथम चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आणि नंतर दोन्ही मुलांवर अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार विरार येथील व्यापारी आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची चार वर्षांची मुलगी गुरुवारी चारकोप, कांदिवली (पश्चिम) येथे त्यांच्या मेहुण्याकडे असताना ही घटना घडली. तक्रारदाराच्या मेहुण्याने तिच्या पाच वर्षांच्या मुलाला, तक्रारदाराच्या मुलीला आरोपी नोकराकडे सोडले होते. दुपारी घरी कोणी नसताना आरोपीने दोघांवर लैंगिक अत्याचार केला. आरोपीने दोन्ही मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा… मुंबईः १४ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करताना चित्रीकरण केले; चौघांविरोधात गुन्हा दाखल
दोन-तीन दिवसांनी मुलांनी त्रास होत असल्याची तक्रार पालकांकडे केली. त्यावेळी पालकांना संशय आला. त्यांनी तात्काळ मुलांना डॉक्टरकडे नेले. त्यावेळी डॉक्टरने तपासणी करून मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर पालकांनी मुलांना काय झाले याबद्दल विचारले. त्यानंतर त्यांनी पालकांना सर्व प्रकार सांगितला. पालकांनी चारकोप पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
हेही वाचा… मुंबई: महारेराकडून आता सुरुवातीपासूनच प्रकल्पावर नजर!
आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलम ३७६ (बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक संभोग) आणि ४ (पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचार), ८ (लैंगिक अत्याचार) आणि १२ (लैंगिक छळ) या कलमांखाली दोन गुन्हे दाखल केले.