सुमारे ३५ लाख रुपयांची रक्कम चोरी करुन पळून गेलेल्या पंकज सिंह नावाच्या नोकराला अवघ्या १२ तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले.
कांदिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने कल्याणजवळील नाशिक महामार्गावर सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी २७ लाख रुपयांची रोख हस्तगत केली. चोरीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा >>>मुंबई लोकलमध्ये १९ वर्षीय मुलीला हार्ट अटॅक, महिला टीसींच्या सावधगिरीमुळे वाचले प्राण
चोरीच्या रोख रकमेबाबत संभ्रम असून मालकाच्या जबाबानुसार ३५ लाख रुपये चोरी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. नोकराकडे २७ लाख रुपये सापडले आहेत. बॅगेत २७ लाख रुपये असल्याचा दावा नोकराने केला आहे. त्यामुळे या नोकरासह मालकाची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. यातील तक्रारदार विकासक असून ते त्यांच्या कुटुंबियांसह कांदिवलीतील महावीरनगर परिसरात राहतात. त्यांनी एक भूखंड खरेदी केला होता. त्याचे पैसे देण्यासाठी त्यांनी नोकर पंकज सिंह व चालकाला संबंधित व्यक्तीकडे पाठविले होते. यावेळी त्यांना एका बॅगेत ३५ लाख रुपये देण्यात आले होते. ही रक्कम दिल्यानंतर त्या व्यक्तीकडून काही कागदपत्रे घेऊन येण्यास सांगण्यात आले. ते दोघेही शुक्रवारी सायंकाळी तेथे गेले होते. सोसायटीत नोंद करताना पंकज हा रोख असलेली बॅग घेऊन दुचाकीवरून घेऊन पळून गेला होता. हा प्रकार चालकाच्या निदर्शनास येताच त्याने ही माहिती त्याच्या तक्रारदार विकासक मालकाला दिली.
हेही वाचा >>>“५००० वर्षे शूद्र स्त्रियांना वक्ष म्हणजेच उरोज झाकताच येत नव्हते, घटकंचुकीची…”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
त्यानंतर त्याने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन पंकजविरुद्ध चोरीची तक्रार केली. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत पंकजविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या पंकजचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. सीसीटिव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने अवघ्या बारा वाजता कल्याणहून नाशिक महामार्गावरून पळून जाण्याच्या तयारीत असताना पंकजला चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांसोबत तक्रारदार स्वत जातीने उपस्थित होते. पंकजकडून पोलिसांनी रोख असलेली बॅग ताब्यात घेतल्यानंतर त्यात पोलिसांना २७ लाख रुपये सापडले. उर्वरित पैशांबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता बॅगेत २७ लाख रुपये होते. त्याने कुठेही पैसे लपविले नाही किंवा पैसे काढले नव्हते. मात्र तक्रारदारानी बॅगेत ३५ लाख रुपये असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्या दोघांची आता पोलिसांकडून चौकशी होणार आहे. बॅगेत नक्की किती रुपये होते याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.