मुंबई : धावपट्ट्यांच्या देखभालीसाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन धावपट्ट्या मंगळवारी सहा तासांसाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, देखभालीचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून विमानतळाची सेवा सहा तासांनंतर पूर्ववत करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या मंगळवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्यात आल्या होत्या. या सहा तासांच्या कालावधीत विमानतळावरून एकही उड्डाण करण्यात आले नव्हते.
हेही वाचा >>> उपनगरांतही बेस्टचा वातानुकूलित प्रवास घडणार; बेस्टच्या १९ दुमजली वातानुकूलित बस लवकरच प्रवाशांच्या सेवेत
पावसाळ्यानंतर धावपट्टीची तपासणी करणे गरजेचे असल्यामुळे देखभालीचे काम हाती घेण्यात आले होते. देखभालीच्या कामाचा भाग म्हणून, धावपट्टीच्या दुतर्फा दिवे बसविणे, भूमिगत वाहिन्या, तसेच रन-वे ९ आणि २७ साठी क्रॅक, डिसॉइंट्स, खराब झालेले पृष्ठभाग आदींची दुरूस्ती करण्यात आली. तसेच धावपट्टीवरील गटारातील खड्डे, प्रकाशासाठी महत्त्वाच्या असलेल्या वाहिन्यांचीही तापासणी या देखभालीच्या कामादरम्यान करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होण्यासाठी विमानतळ प्रशासन कायम प्रयत्न करत असते. चालू आर्थिक वर्षात आंतरराष्ट्रीय आाणि देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मुंबई विमानतळावरून मोठ्या संख्येने प्रवासी दिल्ली, बंगळुरू आणि चेन्न्ई येथे जातात. तर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबई, लंडन आणि अबू धाबी येथे सर्वाधिक प्रवासी जातात.