मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील अडीच कोटी लाडक्या बहिणींना दरमहा एक हजार ५०० रुपये बँक खात्यात जमा होत असल्याने या बहिणींना हे ‘पैसे कसे वापरायचे’ याचे धडे सरकारच्या वतीने दिले जाणार आहेत. त्यासाठी महिला विकास विभागाकडून एक कृती आराखडा तयार केला जात आहे. नागपूरमध्ये काही लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन छोटे व्यवसाय सुरू केल्याने सरकारने या महिला सक्षमीकरणाला बळ देण्याचे ठरविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृती आराखडा तयार करणार

गावातील काही महिला एकत्र येऊन दीड हजार रुपयातील हजार रुपये जमा करुन एका महिलेला दरमहा व्यवसायासाठी मदत करीत आहेत. ५०-१०० लाडक्या बहिणी एकत्र येवून भिशीच्या माध्यमातून ५० हजार ते एक लाख रुपये जमा करीत आहेत. हा निधी प्रत्येक बहिणीला छोट्या व्यवसायासाठी उपलब्ध करुन दिला जात आहे. त्यातून वडापाव व अन्य खाद्यापदाथांच्या गाड्या, छोटे स्टॉल व छोटे उद्याोग उभे राहू लागले आहेत. या योजनेमुळे लाडक्या बहिणी व्यावसायिकही होऊ लागल्या आहेत. महिलांनी या निधीचे नियोजन करुन स्वबळावर उभे राहण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी महिला विकास विभाग लाडक्या बहिणींना गावोगावी तसेच शहरी भागातही सरकारने दिलेल्या पैशाचे नियोजन शिकवणार आहे. त्याचा कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

चाचपणी सुरू

● महिला आर्थिक साक्षरतेमध्ये दीड हजार रुपयांचे अंदाजपत्रक, कर्ज, बचत, आणि गुंतवणूक या प्रशिक्षणात शिकवली जाणार आहे. एका बहिणीच्या पैशाने व्यवसाय उभे राहणार नाहीत पण अनेक बहिणी एकत्र आल्यानंतर व्यवसायाची साखळी तयार होऊ शकते यासाठी महिला विकास विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहकार्य घेतले जाणार आहे.

● राज्यातील लाखो बचत गटांचे आर्थिक नियोजन, व्यवसाय वृध्दीसाठी हे महामंडळ कार्यरत आहे. विशेष म्हणजे या महामंडळाचे महिलांनी घेतलेले कर्ज वेळेवर परत केल्याने महामंडळाचा वसूली दर १०० टक्के आहे. लाडक्या बहिणींना या महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यांना मिळणाऱ्या योजनेतील लाभामधून कर्जाची ही रक्कम मासिक हप्ता मंडळाला हक्काने मिळणार आहे.

● याशिवाय दीड हजारातून काही रक्कम म्युच्युअल फंडांच्या एसआयपी ( सिस्टीमिटीक इन्व्हेसमेंट प्लॅन) सारख्या नवीन गुंतवणूक योजनेत गुंतवता येईल का, याची चाचपणी महिला विकास विभाग करणार आहे, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Session on how to use the money collected under ladki bahin yojana will be given by the government mumbai news amy