लोकलवर दगडफेक आणि लोखंडी सळई फेकून प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ४० वर्षांच्या आरोपीला सत्र न्यायालयाने सारख्याच प्रकारच्या चार गुन्ह्यांत दोषी ठरवले. तसेच प्रत्येक गुन्ह्यात प्रत्येकी १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आपल्या कृतीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येईल, याची आरोपीला पूर्णतः कल्पना होती. त्यानंतरही त्याने लोकलवर दगडफेक केली. तसेच लोखंडी सळई फेकून प्रवाशांना दुखापत केली. आरोपीसारख्या समाजकंटकांना शिक्षा ठोठावून समाजात कठोर संदेश देणे गरजेचे असल्याचे निरीक्षणही न्यायाधीश अभय जोगळेकर यांनी निकाल देताना नोंदवले.

हेही वाचा >>> नरिमन पॉईंट येथील नामांकित हॉटेलमध्ये तरूणीवर लैंगिक अत्याचार; आरोपी गजाआड

पोलिसांच्या आरोपांनुसार, कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान आरोपी राकेश रॉड याने १६ जुलै २०१९ रोजी एकाच दिवशी तीनदा तीन वेगवेगळ्या लोकलवर दगडफेक केली. तसेच एकदा लोखंडी सळई फेकून मारली. आरोपीच्या पहिल्या हल्ल्यात रतनदीप चंदनशिवे हे जखमी झाले. त्यांच्या डाव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली. टिटवाळास्थित अजय कहार (२३) गोवंडीहून कुर्ला मार्गे घरी परतत असताना आरोपीने केलेल्या दगडफेकीमुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. ३२ वर्षीय तौसिफ खान सायंकाळच्या वेळी पनवेलच्या दिशेने प्रवास करत असताना आरोपीने लोकलवर फेकलेली लोखंडी सळई त्यांच्या पोटात लागली. या घटनेत जखमी झालेल्या दोघांच्या डोक्याला टाके पडले. काहींच्या पोटात आणि हातापायाला दुखापत झाली. एका विद्यार्थ्याने या हल्ल्यात स्मरणशक्ती गमावल्याचा दावाही पोलिसांनी केला.

हेही वाचा >>> मानखुर्दमध्ये अल्पवयीन मुलांकडून तरुणाची हत्या

या हल्ल्यांनतर रॉडला लगेचच अटक करण्यात आली तेव्हापासून तो कारागृहात आहे. कचरा वेचणाऱ्यांशी झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात दगडफेक केल्याचा आणि त्याचा मानसिक त्रास होत असल्याचा आरोपीचा बचाव न्यायालयाने फेटाळला. किंबहुना, वैद्यकीय चाचण्यांवरून त्याची मानसिक स्थिती स्थिर असल्याचे दिसून येत असल्याचे न्ययालयाने आदेशात स्पष्ट केले. शिवाय आरोपी हा कुटुंबातील एकटा कमावणारा असल्याची बाब वगळता त्याला शिक्षेत दया दाखवावी असा अन्य कोणताही पुरावा समोर आलेला नाही. उलट त्याने केलेला गुन्हा समाजाच्यादृष्टीने धोकादायक आहे. त्याच्या या कृत्यामुळे जखमी झालेल्यांचे जीवन पूर्वीसारखे राहिलेले नाही. दुखापतीमुळे जगण्यात त्यांना अडचणी येत आहेत. आरोपीने रेल्वेच्या मालमत्तेचेही नुकसान केले आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेता आरोपीच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावताना स्पष्ट केले.

Story img Loader