मुंबई : कुर्ला परिसरात गेल्या महिन्यात झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातासाठी प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि बसचालक संजय मोरे याचे बेफिकीर आणि निष्काळजीपणे बस चालवणे जबाबदार असल्याचे सकृतदर्शनी निरीक्षण सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळताना नोंदवले. तसेच, बसमधील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचा मोरे याचा दावा मान्य करणे कठीण असल्याचे नमूद करून न्यायालयाने तोही फेटाळला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. पठाडे यांनी १० जानेवारी रोजी मोरे याचा जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळला होता. न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची प्रत मंगळवारी उपलब्ध झाली. त्यात, बसमधील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याच्या मोरे याच्या दाव्याचे समर्थन करणारे सकृतदर्शनी कोणतेही पुरावे नाहीत, असे नमूद करून न्यायालयाने त्याचा दावा फेटाळला. आरटीओने बसबाबत सादर केलेल्या अहवालाचा विचार करता कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता हे स्पष्ट होते. त्यामुळे, तांत्रिक बिघाड झाल्याने किंवा ब्रेक फेल झाल्याने हा दुर्दैवी अपघात झाल्याचे मानणे कठीण असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
दरम्यान, आपल्याला १९८९ पासून बस चालविण्याचा अनुभव आहे आणि विद्याुत बसमध्ये यांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला. त्यासाठी आपल्याला जबाबदार धरता येणार नाही, असे मोरे याने न्यायालयाला सांगितले.
‘बसमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता’
दुसरीकडे, न्यायवैद्याक अहवाल आणि आरटीओच्या अहवालाचा दाखला देऊन मोरे हा घटनेच्या वेळी मद्याधुंद अवस्थेत नव्हता. तसेच, बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता. त्यामुळे, मोरे याच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचा दावा करून पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. मोरे हा चांगला चालक नसून त्याच्यापासून धोका आहे. त्यामुळेच, त्याला जामीन मंजूर करू नये. तसेच, सुटका झाल्यास तो पळून जाण्याची शक्यता असल्याचा दावाही पोलिसांनी केला होता.