मुंबई : सोने गुंतवणूक योजनेतील फसवणुकीप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा आणि इतरांविरोधात दाखल तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.शिल्पा आणि तिच्या पतीने स्थापन केलेली सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तसेच कंपनीचे दोन संचालक आणि एक कर्मचारी यांनी दखलपात्र गुन्हा केल्याचे दिसून येते, असे नमूद करून अतिरिक्त एम. पी. मेहता यांनी पोलिसांना उपरोक्त आदेश दिले.
कुंद्रा दाम्पत्याने २०१४ मध्ये एक योजना सुरू केली होती. त्यानुसार, गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने अर्ज करताना सवलतीच्या दराने सोन्याचे संपूर्ण पैसे अगोदर भरणे अनिवार्य होते. योजनेच्या मुदतपूर्तीच्या तारखेला एक मान्य प्रमाणात सोन्याचे वितरण केले जाणार होते.तक्रारदाराने २ एप्रिल २०१९ रोजी पाच हजार ग्रॅम २४ कॅरेट सोने वितरित केले जाईल या आश्वासनावर पाच वर्षांच्या योजनेअंतर्गत ९० लाख ३८ हजार ६०० रुपये गुंतवले. तथापि, मुदतपूर्तीच्या तारखेला आणि नंतर सोन्यासाठीची रक्कम कधीही वितरित केली गेली नाही. शेट्टी, कुंद्रा आणि इतरांनी एक बनावट योजना तयार करून त्याद्वारे फसवणूक केली, असे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे. तसेच, कारवाईची मागणी केली.