सोडत काढल्यानंतर काही काळाने घरांची किंमत आकस्मिकपणे वाढवत यशस्वी अर्जदारांवर भरुदड टाकण्याची परंपरा ‘म्हाडा’ने सुरू केली आहे. मालवणी आणि पवईतील घरांचे दर वाढवल्यानंतर आता, २०१० च्या सोडतीमधील मानखुर्द येथील अत्यल्प व अल्प उत्पन्न गटांतील घरांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.
‘म्हाडा’ने २०१० मध्ये काढलेल्या सोडतीत मानखुर्द येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी १०१८ तर अल्प उत्पन्न गटासाठी ९३ घरे होती. महानगरपालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळत नसल्याने या घरांचा ताबा अद्याप रखडला आहे. त्यामुळे लॉटरीत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांचे घरात रहावयास जाण्याचे स्वप्न दूरच राहिले असताना मेटाकुटीस आलेल्या या लॉटरी विजेत्यांवर ‘म्हाडा’ने आता दरवाढीचा बोजा टाकला आहे.
अत्यल्प उत्पन्न गटातील १०१८ घरांचा दर ३,९४,४५० रुपये होता. आता तो ९८,८७१ रुपयांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता या १०१८ यशस्वी अर्जदारांना घरासाठी एकूण ४,९३,३२१ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच सोडतीच्या वेळी अल्प उत्पन्न गटातील ९३ घरांचा दर ७,६५,८५२ रुपये होता. त्यात २,६५,८५२ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता ९३ यशस्वी अर्जदारांना घरासाठी १०,०३,५२६ रुपये मोजावे लागतील. ‘म्हाडा’ने मागच्या वर्षी प्रथम मालवणी येथील घरांची किंमत अडीच लाख रुपयांनी वाढवली होती. नंतर पवई येथील घरांची किंमत तब्बल १५ लाख रुपयांनी वाढवण्यात आली. त्या दरवाढीच्या विरोधात अर्जदारांनी आवाज उठवला, पण सरकारकडून न्याय मिळाला नाही. पवईतील यशस्वी अर्जदार थेट न्यायालयात गेले. न्यायालयाने निकाल लागेपर्यंत वाढीव दर जमा करावा, असा आदेश दिला आहे. त्यामुळे ‘म्हाडा’चे धाडस वाढले असून त्यातूनच मानखुर्दच्या सोडतीमधील ११११ अर्जदारांना दरवाढीचा धक्का देण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा