विधानभवनाबाहेरच्या रस्त्यावर सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले घोळके दिसतात. हातातली कागदपत्रं सांभाळणाऱ्या नजरा कुणाला तरी शोधत असतात. समोरून घाईघाईनं कुणीतरी येतो, दोघं एकमेकांना भेटतात, कागदपत्रं ताब्यात दिली जातात. आणि कानाशी लागून कुणीतरी हळूच काहीतरी कुजबुजतो. कान टवकारलेला तो माणूस डोळे बारीक करत मान हलवतो, आणि दोघे एकमेकांकडे बघून गूढ हसतात..
बाहेरच्या भिंतींना हे सगळं दिसत असतं. त्याही एकमेकींकडे बघून डोळे मिचकावतात.
‘सेटलमेंट’.. एक भिंत दुसरीकडे पाहून हळूच बोलते.
अलीकडं, ‘सेटलमेंट’ या शब्दामुळे काहींच्या सेंटिमेंटसना धक्का पोचलाय. हा शब्द खूप बोचरा झालाय.. पण सहन होत नाही, सांगताही येत नाही आणि सोडताही येत नाही.. स्थिती अशी अवघड झालीय.
अधिवेशन सुरू व्हायच्या आधीच विरोधी दालनाच्या जाणत्या भिंतींना याचा अंदाज आला होता.
आता हा शब्द आपला पिच्छा पुरवणार.. तेव्हा कुणी डिवचलंच, तर ठोस उत्तर द्यायची तयारी करायलाच हवी, असं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी दालनांच्या सगळ्या भिंतींनी बैठकीत एकमुखानं ठरवलं.
दोन दिवस त्याचीच चर्चा सगळीकडे सुरू होती. सभागृहातही भाऊंनी जोरदार आव्हानच दिलं..
काल सभागृहाचं कामकाज संपलं, सगळीकडे सामसूम झालं, आणि ‘सेटलमेंट’नं फार छळलं नाही, या आनंदात विरोधी दालनांच्या भिंती निवांत झाल्या.
सकाळी पुन्हा परिसर गजबजू लागला, आणि भिंतींनी कान टवकारले. सगळीकडून हाच शब्द कानावर आदळतोय, असा भास त्यांना होत होता. पुन्हा भिंतींची बेचैनी वाढली. मग दालनांचे दरवाजे उघडले. आता या भासामागचं कारण कळणार होतं. िभतींनी एकमेकींना खाणाखुणा केल्या, आणि नजरा आतल्या खुच्र्याकडे लागल्या.
‘काय झालं असेल रात्री तिकडे?’ साहेबांच्या समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनं डोळे बारीक करून अगदी हळू आवाजात साहेबांना विचारलं, आणि साहेबांनी खांदे उडवले. ते जरासे हसले.
काय विनोद झाला, हे न उमजून कार्यकर्ता गोंधळला. साहेबांनी इकडेतिकडे बघितलं. आणि पुन्हा खांदे उडवले. कार्यकर्त्यांला काहीच कळलं नव्हतं. पण त्यानं मान हलवली, आणि साहेब हसले म्हणून तोही हसला. मग दोघंही खळखळून हसले..
भिंतींनी एकमेकींकडे बघितलं.
‘सेटलमेंट?’.. एकीनं दुसरीच्या कानात विचारलं. पण दुसरी भिंत काहीच बोलली नाही. तिनंही नुसतेच खांदे उडवले. मग दोघीही खळखळून हसल्या.
‘मध्यरात्री ते तास दीडतास एकमेकांना भेटले आणि फक्त पार्कावरचे गार वारे झेलत, चहापाणी घेऊन निघाले असतील?’. एका भिंतीचं कुतूहल शमतच नव्हतं. ‘काहीतरी चर्चा झालीच असेल ना?.. की माफी मागण्यासाठी ते तिकडे गेले असतील?’..
‘म्हणजे, सेटलमेंट?’ दुसरी म्हणाली. पण पहिलीनं नुसतेच खांदे उडवले.
मग िभती गप्पच झाल्या. उगीचच कार्यकर्त्यांचे चेहरे न्याहाळत बसल्या. सगळेच उदास दिसत होते.
भाऊंच्या दालनात गर्दी जमू लागली होती. तेही भलतेच नाराज दिसत होते.
‘काल एवढी आगपाखड केली, आणि आज गप्प बसावं लागतंय’.. साहेब समोरच्या भिंतीकडे बघून स्वतशीच बोलल्यासारखं म्हणाले, आणि त्यांचे डोळे विस्फारले.
‘सेटलमेंट?’ िभत हळूच आपल्या कानाशी कुजबुजतेय, असा भास भाऊंना झाला. ते कावरेबावरे झाले. इकडेतिकडे पाहात त्यांनी खांदे उडवले, आणि ते बाहेर पडले..
िभंतीनी एकमेकींकडे बघच डोळे मिचकावले, आणि खांदे उडवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Settlement
Show comments