अवजड वाहनांची अनियंत्रित वाहतूक आणि सुसाट वेग यामुळे मंगळवारी मुंबई-गोवा महामार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या चार वेगवेगळय़ा अपघातांत सात जणांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. मृतांमध्ये मुंबईच्या पाच जणांचा समावेश आहे. येथील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महामार्गावरील अवजड वाहतूक नियंत्रित करण्याची मागणी केली जात आहे.
कणकवलीहून मुंबईकडे निघालेल्या सुमोने मुगवलीजवळ ट्रकला धडक दिली. या अपघातात ३ जण ठार तर ५ जण जखमी झाले. चंद्रकांत नरहरी सोनार, अनिष चंद्रकांत सोनार, मालती हेमंत वेदक अशी मृतांची नावे असून तिघेही दहीसर येथील रहिवाशी आहेत. या अपघातात अन्य सहा जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले. खोपोलीजवळ क्वालिस आणि टाटा टेम्पो यांच्यात धडक झाली. या अपघातात गोपीनाथ चव्हाण (अंधेरी) आणि गणपत मोहिते (खारघर) यांचा जागीच मृत्यू झाला. लोणेरे इथे एसटी बसने मोटर सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १ जण ठार तर १ जण जखमी झाला आहे. कुरवडाजवळ ट्रक आणि स्विफ्ट कार यांच्यात  झालेल्या आणखी एका अपघातात १ जण ठार तर ३ जण जखमी झाले. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास हा अपघात झाला.  याच महामार्गावर टोळ फाटय़ाजवळ झालेल्या टवेरा आणि स्विफ्ट कार यांच्या अपघातात साताऱ्याचे ६ जण जखमी झाले.   गेल्या काही दिवसांत इंदापूर ते लोणेरे या पट्टय़ातील अपघातांचे प्रमाणच प्रचंड वाढल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या टप्प्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एकाच कुटुंबातील पाच ठार
सांगली : विटाजवळील नागेवाडीच्या यशवंत साखर कारखान्यानजीक मोटार आणि राज्य परिवहन महामंडळाच्या मिनी बसची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील दोन महिलांसह पाचजण जागीच ठार झाले. कार्वे (ता. खानापूर) येथील गणपती निवृत्ती जाधव हे आपल्या कुटुंबासह माहुली (जि. सातारा) येथे नातेवाइकाच्या लग्नासाठी असताना त्यांच्या वाहनाने मिनी बसला धडक दिली. यात जाधव यांच्यासह त्यांची पत्नी, आई व दोन मुलांचा मृत्यू झाला, तर जखमी असलेल्या त्यांच्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sevan killed in 4 mishaps on mumbai goa highway
Show comments