मुंबई : राज्यात हवामान बदल, ओला, कोरडा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणामुळे २०२४ मध्ये रोज सरासरी सात प्रमाणे वर्षभरात २,७०६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागात शेतकरी आत्महत्येची स्थिती गंभीर आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गंभीर असल्याची कबुलीही दिली आहे.

विधान परिषदेत शिवाजीराव गर्जे, अमोल मिटकरी आदींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले, २०२४ मध्ये वर्षभरात एकूण २,७०६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यापैकी १,५६३ आत्महत्या सरकारी मदतीला पात्र आहेत, तर ४१९ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. सरकारकडून मदत देण्यात आलेली प्रकरणे १,१०१ आहेत.

शेतकरी आत्महत्यांची स्थिती छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागात भीषण आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये वर्षभरात ९५२ आत्महत्या झाल्या आहेत. त्यात बीडमधील २०५ आत्महत्यांचा समावेश आहे. अमरावती विभागात १,०६९ आत्महत्या झाल्या. त्यात अमरावती जिल्ह्यात २००, अकोल्यात १६८ आणि वर्धा जिल्ह्यात ११२ आत्महत्यांचा समावेश आहे.

Story img Loader