महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी आता सातकलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. महिला पोलिसांची संख्या वाढविणे, महिलांच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेणे याबरोबरच महिलांना आधार देण्यासाठी पोलीस ठाण्याचे वातावरण घरच्यासारखे करणे आदी उपायांचा त्यात समावेश आहे.
चालू वर्षांत मुंबईत बलात्काराच्या २१३ तर विनयभंगाच्या १९३ घटना घडल्या. त्यामुळे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांना न्याय देण्यासाठी सातकलमी कार्यक्रमाची घोषणा केली. बुधवारी पत्रकार परिषदेत त्यांनी त्याची माहिती दिली. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन पोलीस उपायुक्तांना त्याची माहिती देण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून त्यांचे मोबाईल क्रमांक पोलीस ठाणे आणि पोलीस चौक्यांमध्ये दर्शनी भागात मोठय़ा अक्षरात लिहून ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे पीडित महिलांना या महिला पोलिसांशी थेट संवाद साधता येणार आहे.
एखादी पीडित महिला पोलीस ठाण्यात आली तर तिला घरच्यासारखे भावनिक वातावरण मिळावे, यासाठी पोलिसांना खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला बचत गट, महिला संस्था, आदींच्या बैठका नियमित बोलावून महिला दक्षता समित्यांचे पुर्नगठन करण्यात येणार आहे. सध्या मुंबईत एक हजार तक्रार पेटय़ा असून त्यांची संख्या वाढवून ती चार हजार करणार येणार असल्याचे सिंग यांनी सांगितले.
मुंबईतील महिलांवरील अत्याचारांची संख्या मोठी असली तरी या गुन्ह्यात ओळखीच्या लोकांचाच सहभाग जास्त असल्याचे सांगत मुंबई सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी केला.    
मुंबईतील अत्याचाराच्या घटना
वर्ष        २०११    २०१२
बलात्कार     २१५     २१३
महिला अपहरण    १६५    १४१
हुंडय़ासाठी छळ    २८०    २६७    
विनयभंग    १६०    १९३

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा